सिन्नर – तालुक्याच्या पश्चिम भागातील ठाणगाव,वडगाव सिन्नर, पांढुर्ली व टाकेद गटातील साकुर या वीजउपकेंद्रांना सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी स्वतंत्र वीज वाहिन्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे,अशा सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी वीजवितरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
तालुक्यातील खापराळे येथे १३२ केव्ही वीज केंद्रातील ४ वीजउपकेंद्रांसाठी आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या २ कोटी ९० लाख रुपयांच्या नवीन वीजवाहिनी टाकण्याच्या कामाच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य तातू जगताप, ठाणगावचे सरपंच ए. टी. शिंदे,पाडळीचे माजी सरपंच अशोक रेवगडे, कोनांबेचे माजी सरपंच संजय डावरे, दीपक जगताप, दत्ता पगार,नाशिक ग्रामीणचे कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, उपकार्यकारी अभियंता सचिन पवार,इप्पर उपस्थित होते.
सिन्नरच्या पश्चिम भागात पाणी आहे. मात्र, विजेची समस्या गंभीर आहे. तालुक्यातील तीन व टाकेद गटातील एका उपकेंद्रांतर्गत गावातील कृषी ग्राहक वारंवार खंडित होत असलेल्या वीजेमुळे त्रस्त झाले आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी आपण खापराळे येथील १३२ केव्ही केंद्रावरून पांढुर्ली व साकुर उपकेंद्रांसाठी ३३ केव्ही वाहिनी टाकण्यासाठी २ कोटी ५० लाख तर सिन्नर येथून वडगाव व ठाणगाव येथे गेलेल्या वीजवाहिनीवरील भार कमी करण्यासाठी वडगाव वीज उपकेंद्राला स्वतंत्र वीजपुरवठ्यासाठी खापराळे येथून स्वतंत्र वीज वाहिनीसाठी ४० लाख रुपये निधी मंजूर करून आणला आहे. त्यामुळे सुरू करण्यात आलेली ही कामे पूर्ण झाल्यानंतर कृषिसह विविध प्रकारच्या १० हजारांहून अधिक वीजग्राहकांची वारंवार खंडित होणाऱ्या वीजेपासून सुटका होणार असल्याचे कोकाटे म्हणाले.
ठाणगाव व वडगाव या उपकेंद्रांना दुहेरी वीजपुरवठा..
ठाणगाव वीज उपकेंद्रासाठी सध्या सिन्नरहून ३३ केव्ही वाहिनीद्वारे वीजपुरवठा होत आहे.याच वाहिनीला वडगाव उपकेंद्राची वाहिनी जोडलेली आहे. मात्र, वाढता वीजभार व जुनी वीजवाहिनी यामुळे अनेकदा वीजपुरवठा खंडित होत असतो. २० किमी अंतर लांब असलेली ही वाहिनी नादुरुस्त झाल्यास ती दुरुस्त करण्यासाठी अनेकदा एक ते दोन दिवस लागतात. त्यामुळे वाहिनीवरील वडगाव उपकेंद्राचा भार कमी करून या उपकेंद्रासाठी खापराळे येथून ४० लाख रुपयांची स्वतंत्र वीजवाहिनी टाकण्यात येणार आहे. तथापि, सिन्नरहून ठाणगाव व खापराळेहून वडगांवला गेलेली वीजवाहिनी वडगावजवळ एकमेकींना लिंक करण्यात येणार असून यातील एखादी वाहिनी खराब होऊन वीजपुरवठा खंडित झाल्यास दुसऱ्या वीज वाहिनीवरून या उपकेंद्रांना वीजपुरवठा होऊ शकणार आहे. त्यामुळे या दोन्ही वीजकेंद्रांना दुहेरी वीजपुरवठा होणार आहे.