सिन्नर- तालुक्यातील भोकणी गावात दरवर्षी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडीचे आगमन होत असते. मात्र, दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे पायी दिंडी सोहळा खंडित झाला आहे. फक्त पादुकाच एस. टी. ने पाठवल्या जातात. त्यामुळे भोकणी गावात दोन वर्षापासून दिंडी येत नाही. मात्र, या वर्षी ग्रामविकास मंचने वृक्ष दिंडीचे आयोजन करीत गावातील मंदिरांच्या आजूबाजूला झाडे लावून खंडित असलेले पायी दिंडी सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा केला.
ग्रामविकास मंचचे अध्यक्ष,भोकणीचे सरपंच अरुण वाघ यांच्या हस्ते गावचे ग्रामदैवत श्री जालिंदर नाथ महाराज मंदिरासमोर झाड लावून या सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्राम पंचायत सदस्य कांताराम कुऱ्हाडे, मंचचे शांताराम कुऱ्हाडे, रघुनाथ साबळे, शिवाजी कुऱ्हाडे, रितेश मालानी, संदीप वाघ, संपत ओहोळ, अकील सैय्यद, राजाराम वाघ, राजू साबळे, रविकांत साबळे, सुनील साबळे, पांडुरंग कुऱ्हाडे, सुरज वाघ, सार्थक साबळे, दीपक साबळे, तात्या पाटील, ज्ञानेश्वर दराडे आदी सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनी मंदिराच्या अवतीभोवती झाडे लावून आगळ्या वेगळ्या सोहळ्याचा आनंद घेतला. वड, पिंपळ, कदंब, सिल्वर, ओक अशी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.