नाशिक – मासिक पाळी व स्वच्छतेचे महत्व यासंबंधी जनजागृती करण्यासाठी वेश्या वस्तीतील महिलांसाठी सॅनिटरी पॅड निर्मिती केंद्राचे उद्घाटन शनिवार दिनांक २६ जून २०२१ रोजी दुपारी साडेतीन वाजता आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते होणार आहे.
शारीरिक आरोग्या संबंधी जनजागृती करण्यासाठी वेश्या वस्तीतील महिलांसाठी हा आंतरराष्ट्रीय सेवा प्रकल्प लेडीज सर्कल इंडिया “क्रिमसन” च्या योजनेअंतर्गत नाशिक मध्ये राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत सहभागी महिलांना बुधवार व गुरुवार रोजी सॅनिटरी पॅड निर्मितीचे प्रशिक्षण नाशिक लेडीज सर्कल ११९ व प्रवरा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आले आहे. त्यामध्ये प्लास्टिक विरहित सॅनिटरी नॅपकिन बनवण्यास शिकविण्यात आले. विशेष गोष्ट म्हणजे या सॅनिटरी नॅपकिन ऊत्पादनात प्लास्टिकचा वापर नसून ते जैविक विघटनशील (बायोडिग्रेडेबल) व पर्यावरण पूरक असणार आहे. या सेवा प्रकल्पातून स्वावलंबन आणि रोजगाराची शाश्वत साधने उपलब्ध करुन देणे तसेच या वंचित महिलांना अधिक सन्माननीय जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा पथदर्शी प्रकल्प नाशिकमध्ये राबविण्यात येत आहे. निर्मिती सुरु होण्यापूर्वीच सॅनिटरी पॅड्सच्या काही ऑर्डरदेखील मिळाल्या आहेत. हे निर्मिती व वितरण केंद्र सध्या प्रवरा ट्रस्ट कार्यालय, दुसरा मजला, किस्मत बाग, जीपीओ समोर, नाशिक येथे सुरु आहे, अशी माहिती नाशिक लेडीज सर्कलच्या समन्वयक मेघा राठी, सचिव स्नेहा जोहरी व अध्यक्ष डॉ. शीतल सेठी यांनी दिली आहे.