सिन्नर- राज्यात खरीप हंगामास सुरवात झाली असून, त्यादृष्टीने शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे जोमात सुरू झाली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानावर अधारित बी.बी.एफ पेरणी यंत्राच्या सहाय्याने पीक पेरणी केल्यास शेतकऱ्याला उत्पन्नवाढीसाठी निश्चितच लाभ होईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी केले.
सिन्नर तालुक्यातील वडगांव येथे भागवत बलक यांच्या शेत-शिवारात राज्यस्तरीय कृषी संजीवनी मोहिमेचा शुभारंभ कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, कृषी सहाय्य्क संचालक संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, सिन्नर प्रांताधिकारी पुजा गायकवाड, उदय सांगळे, कोंडाजीमामा आव्हाड,वडगावच्या सरपंच मंदाकीनी काळे आदी उपस्थित होते.
यावेळी कृषिमंत्री श्री.भुसे म्हणाले, संपूर्ण राज्यात २१ जून २०२१ ते ०१ जुलै २०२१ या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम राज्यात राबविण्यात येत आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने राज्यात युरीयाचा बफर स्टॉक केला असून, युरीयाचा महाराष्ट्रात तुटवडा भासणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यानी खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मुग, उडीद, कापूस, मका व हरबरा पिकांच्या पेरणीसाठी बी.बी.एफ पेरणी यंत्र खुप उपयुक्त असून या यंत्राच्या सहाय्याने पेरणी केल्यास निविष्ठा खर्चात 20 ते 25 टक्के बचत होऊन, उत्पन्नात 25 ते 30 टक्के वाढ निश्चित मिळते. अवर्षणप्रवण क्षेत्रात याचा उपयोग प्रभावीपणे होऊ शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकरी बांधवांशी प्रश्नोत्तराच्या माध्यामातून साधला संवाद
यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून, यात शेततळ्यांसाठी कुंपन, सोयाबीन लागवड, नाविण्यपूर्ण प्रयोग, आधुनिक वाण, बियाणाचा वापर, कृषी योजना यावर सविस्तर मार्गदर्शनही मंत्री श्री.भुसे यांनी केले. पीक विमा व फळपीक विमा हा या वर्षापासून एेच्छीक केला असून, शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्र शासनाकडे विमासंबधी बीड मॉडेल सादर केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कोरोना काळात बळीराजा ठरला सर्वांचा पोशिंदा
आज आपण गेल्या वर्षापासून कोरोना संकटाचा सामना करत आहोत. पाच ते सहा महिन्यांचा लॉकडाऊन कालावधी सुध्दा आपण सर्वांनी अुनुभवला आहे. या कालावधीत सर्वच व्यवहार बंद होते. मात्र, सर्वांपर्यत अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दुध हे वेळेत पोहचले, याचे सर्व श्रेय माझ्या बळीराजाला जाते, तो उभ्या जगाचा पोशिंदा असून त्याचा मला अभिमान असल्याचे गौरवोद्गारही मंत्री भुसे यांनी काढले.
यावेळी शेतकरी भागवत बलक यांच्या शेतात बी. बी. एफ. पेरणी यंत्राद्वारे पेरणीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला ट्रॅक्टर व बियाणे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. कृषिमंत्री मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते वसंतराव नाईक कृषि भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी कारभारी सांगळे, वसंतराव नाईक कृषि शेती निष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी भागवत बलक, रामहरी सुरसे, बाळासाहेब मऱ्हाळे, आहिल्याबाई होळकर रोपवाटिका धारक महिला शेतकरी अलका बोडके यांचा सत्कार करण्यात आला आहे.तसेच यावेळी खरीप हंगाम 2019 अंतर्गत बीबीफ लागवड तंत्रज्ञान घडीपत्रिकेचे विमोचन कृषी मंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.