सिन्नर- खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांतून आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, नाशिक यांच्या मदतीने सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात स्वंयमनिर्मित ऑक्सिजन युनिट बसविण्यात आले आहे. उद्या बुधवार (दि.१२) रोजी सकाळी दहा वाजता या स्वंयमनिमिर्मित ऑक्सिजन युनिटचा लोकार्पण सोहळा खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याची दखल घेऊन खा. गोडसे यांनी सिन्नरच्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात स्वंयमनिर्मित ऑक्सिजन युनिट बसविण्याचा शब्द दिला होता. खा. गोडसे यांच्या विनंतीनंतर नाशिक शहरातील काही बांधकाम व्यावसायिकांनी हे मशीन उपलब्ध करुन दिले असून या मशिनचे इनस्टॉलेशनचे काम पूर्ण झाले आहे. उद्या बुधवारपासून हे युनिट कार्यान्वित होणार आहे. लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आ. राजाभाऊ वाजे असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या सभापती शोभा बरके, नगराध्यक्ष किरण डगळे, उपसभापती संग्राम कातकाडे, तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे, शहर प्रमुख गौरव घरटे, उदय सांगळे, पिराजी पवार, बांधकाम व्यावसायिक अभय चौकसी, विजय बाविस्कर, भाऊसाहेब सांगळे, बी.टी. कडलग आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदरचे युनिट बडोदा येथील ॲरो या कंपनीकडून खरेदी करण्यात आले आहे. या युनिटची ऑक्सिजन निमिर्तीची क्षमता प्रतितास १० एन.एम.क्यू. इतकी आहे. या युनिटमुळे सुमारे ४५ ते ५० रुग्णांना २४ तास ऑक्सिजन उपलब्ध होणार असून दिवसभरात जवळपास ३५ ते ४० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर भरता येणार आहेत. यामुळे ऑक्सिजनअभावी होणारी रुग्णांची गैरसोय दूर होणार असल्याने सिन्नरसह तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.