सिन्नर – माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित देवपूर हायस्कूल व एस.जी.कनिष्ठ महाविद्यालयातील ७०० विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणामुळे आपला उरलेला वेळ पर्यावरण संवर्धनासाठी वापरणार असून त्यातून आपल्या परिसरात वृक्षलागवड करून त्याची जोपासना ते करणार आहेत. या मोहिमेचा शुभारंभ सिन्नर पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख व माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष दौलतराव मोगल यांच्या हस्ते विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपणाने करण्यात आला.
मागील वर्षाप्रमाणेच यंदाही विद्यार्थ्यांना घरबसल्याच ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागणार आहे. शाळेत प्रत्यक्ष यावे लागणार नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ शिल्लक राहणार आहे. या शिल्लक वेळेचा पर्यावरण संवर्धनासाठी उपयोग करून घेण्याचे प्राचार्य संजय जाधव यांनी ठरवले. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड आपल्या घराजवळ, शेताजवळ अथवा रस्त्याच्या बाजूला लावून ते मोठे होईपर्यंत त्याची जोपासना करावी असे आवाहन त्यांनी केले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड सुरू केली आहे. शिक्षक वेळोवेळी या झाडांची पाहणी करणार आहेत. शिवाय विद्यार्थीही सामाजिक माध्यमाद्वारे दर आठवड्याला झाडांच्या फोटोसह त्याच्या वाढीची माहिती आपल्या वर्गशिक्षकांना पाठवणार आहेत. त्याबाबत आर.वाय.मोगल, सुमन मुंगसे, श्रीहरी सैंद्रे, सुनील पगार, वैशाली पाटील, शंकर गुरुळे, एनडीएसटीचे संचालक दत्तात्रय आदिक, विलास पाटील, प्रमोद बधान, नानासाहेब खुळे, मीनानाथ जाधव, गणेश मालपाणी, सुवर्णा मोगल, ताराबाई व्यवहारे, नारायण भालेराव, अशोक कळंबे व सतीश गायकवाड आदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे.
शिक्षकही करणार वृक्षलागवड..
विद्यार्थ्यांना देशी वृक्षांची लागवड करण्याचे आवाहन विद्यालयामार्फत करण्यात आले. त्यानुसार देवपूर, धारणगाव, फर्दापूर व मानमोडा या भागात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होत असून विद्यालयाच्या परिसरातही वृक्षलागवड करण्यात येत आहे. त्याचबरोबर शिक्षक आपल्या घराजवळ, शेताजवळ आणि शक्य असेल तिथे वृक्ष लागवड करत आहे.
….
पंचक्रोशीत झाडे लावावी..
सध्याच्या काळाचा शिक्षकांनी वृक्षलागवडीसाठी उपयोग करून घ्यावा. फक्त शाळेत झाडे लावण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या मदतीने पंचक्रोशीत जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे.
दौलतराव मोगल, उपाध्यक्ष, मालोशि मंडळ, सिन्नर
…..
पालकांनीही या मोहिमेत सामील व्हावे..
विद्यार्थ्यांना वृक्षलागवडीसाठी सहकार्य करण्याबरोबरच आपल्या पाल्याच्या बरोबरीने पालकांनीही वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत सामील व्हावे. शक्यतो पुरेसा प्राणवायू देणारी आणि दीर्घकाळ टिकणारी झाडे लावावी.
प्रा. संजय जाधव