सिन्नर- ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या तालुक्यातील कोविड सेंटर, विलगीकरण सेंटर अथवा घरीच उपचार घेणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांसाठी प्रकल्प मुंबई संस्था व ‘युवा मित्र’ ने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून ५ लिटर क्षमतेचे ६ तर १० लिटरचे २ असे ८ कॉन्सन्ट्रेटर मशीन्स युवा मित्रच्या लोणारवाडी कार्यालयात ठेवण्यात आले आहेत. तालुक्यातील गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घेत आपले आरोग्य जपावे असे आवाहन युवा मित्रच्या कार्यकारी संचालिका मनिषा पोटे यांनी केले आहे.
कोविड -19 च्या दुसर्या लाटेत, नाशिक हा महाराष्ट्रातील कोविडचे सर्वाधिक रुग्ण असलेला जिल्हा म्हणून समोर आला. एकाच वेळी अधिक रुग्ण आढळल्याने या काळात वैद्यकीय क्षेत्रातील पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडून पडल्या. या लाटेत शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात कोविडचा प्रसार अधिक प्रमाणात दिसून आला. ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, इंजेक्शन्स आणि ऑक्सिजन पुरवठा घेण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयांमध्ये जागेची उपलब्धता आणि खासगी रुग्णालयांमध्ये जास्त उपचार खर्च यामुळे अनेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.
ऑक्सिजन सिलेंडर वेळेवर उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशी वेळ पुन्हा तालुक्यातील रुग्णावर येऊ नये यासाठी हे ८ कॉन्सन्ट्रेटर मशीन्स प्रकल्प मुंबईने उपलब्ध करुन दिले आहेत. घरातीलच हवेतून ऑक्सिजन शोषून रुग्णाला पुरवण्याचे काम ही मशीन्स करणार असून ऑक्सिजन
सिलिंडरसाठी कराव्या लागणाऱ्या धावपळीतूनही रुग्णांच्या नातेवाईकांची सुटका होणार आहे. डॉक्टरांच्या शिफारशीनुसार ही मशीन्स तालुक्यातील गरजू रुग्णांना कोणतेही भाडे न आकारता उपलब्ध करुन दिली जाणार असून ते वापरण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षणही युवा मित्रकडून दिले जाणार आहे.
या मशिन्सच्या वापराबाबत डॉ. भारत पाटोळे व डॉ. सौ. पौर्णिमा पाटोळे यांनी युवा मित्रच्या निवडक कार्यकर्त्यांना नुकतेच प्रशिक्षण दिले. घरातीलच चांगले शुद्ध ग्लासभर पाणी, विजेचे कनेक्शन मशीनसाठी आवश्यक असून मशिनच्या बाहेरच्या बाजूने बसवलेली फिल्टर जाळी वेळच्या वेळी साफ करुन हे मशीन रुग्णाला आवश्यक तेवढा वेळ सलग वापरता येणार आहे.
ही मशीन्स उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प मुंबई संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक शिशिर जोशी, एच. टी. पारेख फाउंडेशनच्या स्विटी थॉमस यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे मनिषा पोटे यांनी स्पष्ट केले आहे.