सिन्नर– सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांकडील मक्याची हमी भावाने खरेदी करण्याचा शुभारंभ सोमवारी सकाळी १०.३० वाजता माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संघाचे तालुकाध्यक्ष कचरू गंधास यांनी दिली.
येत्या ३० जुनपर्यंत ६ हजार क्विंटल मका खरेदी करण्याचे उद्दिष्ट शासनाने संघाला दिले आहे. संघाच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी खरीपाबरोबरच रब्बी हंगामातही १८५० रुपये प्रती क्विंटल हमीभावाने मका खरेदी करण्यात येणार असल्याने तालुक्यातील मका उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. शासनाच्या पोर्टलवर यापूर्वीच शेतकऱ्यांनी मका विक्रीबाबत नोंदणी केली होती. मात्र, दोन महिन्यानंतरही मका खरेदी सुरु होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मका खरेदी सुरु झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सिन्नर तहसील कार्यालयामागील शासनाच्या गोदामामध्ये खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी २ वजन काटे लावण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी प्राथमिक स्वरुपात ५ शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यात येणार आहे. त्यानंतर दररोज ३० तारखेपर्यंत मका खरेदी सुरु राहणार आहे. खरेदीच्या शुभारंभीप्रसंगी तहसीलदार राहूल कोताडे, सहाय्यक निबंधक संदीप रुद्राक्ष उपस्थित राहणार आहेत. मका खरेदी केंद्रावर मका आणून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.