आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांना यश
सिन्नर – सिन्नर तालुक्यातील युवकांचा शासकीय सेवांमध्ये टक्का वाढण्यासाठी तालुक्यात पायाभूत सेवा उभ्या करण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांना यश आले असून ग्रामविकास विभागामार्फत सहा गावांमध्ये एक कोटी ऐंशी लाख रुपयांच्या अभ्यासिका इमारती मंजूर झाल्या आहेत.
काळानुरूप मानवाच्या गरजा बदलत आहेत. अगदी क्लार्क पासून ते अधिकारी पदाची सरकारी नोकरी मिळवतांना आता स्पर्धा परीक्षा द्यावी लागते.विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतानाही पात्रता परीक्षा द्यावी लागते.ग्रामीण भागात यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे असल्याची बाब ओळखून आमदार माणिकराव कोकाटे यांनी पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ३० लाख रुपयांच्या तालुक्यातील वावी,चास,शिवडे,पाथरे बु,मुसळगाव व नायगाव या गावांमध्ये अभ्यासिका इमारती मंजूर करून आणल्या आहेत.या भागातून कोपरगाव, संगमनेर व नाशिक येथे अभ्यासाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता जवळच अभ्यासाची सोय होणार आहे.
पांगरी बु येथे पन्नास लाख रुपयांतून होणार सभागृह..
पांगरी बु येथील नागरिकांनी सामाजिक सभागृहाची मागणी आमदार कोकाटे यांच्याकडे केली होती.दहा ते पंधरा लाख रुपयांतून होणाऱ्या सभागृहात पुरेशी माणसेही बसत नाही आणि त्याठिकाणी पुरेशा सुविधाही देता येत नसल्याने असे सभागृह फक्त दिखाव्याची वास्तू म्हणून उभी राहते, ही गोष्ट हेरून पांगरी येथे प्रशस्त सभागृह होण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी कोकाटे यांनी मंजूर करून आणला.
प्रत्येक गटात अभ्यासिका…
शासकीय नोकरीत आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांना संधी मिळून तालुक्याचा या सेवेतील टक्का वाढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात एक अभ्यासिका इमारत मंजूर करून आणण्यात आमदार कोकाटे यांना यश मिळाले आहे.ग्रामविकास विभागाच्या मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत ही कामे मंजूर झाली असून त्यासाठी ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी सहकार्य केले आहे. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत आतापर्यंत तालुक्यात एका कामासाठी जास्तीत जास्त १५ लाख रुपये मिळायचे. आता ३० लाख ते ५० लाख रुपयांचे एक काम मंजूर झाले आहे.