सिन्नर -सिन्नर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या प्रमुख,उपप्राचार्य सौ. शकुंतला नामदेवराव हिरे-गायकवाड या नुकत्याच ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्या. सेवानिवृत्ती निमित्त प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्य रसाळ म्हणाले की, शहरालगत असणाऱ्या मळहद्दीतील गायकवाड मळा हे त्यांचे माहेर. आपण शिकलो नाही तर आयुष्यभर वीड्या बांधाव्या लागतील. त्यामुळे मॅडम जिद्दीने शिकल्या. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी शेतातील कामे करत पूर्ण केले. ज्या महाविद्यालयात त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. त्याच महाविद्यालयांत त्या उपप्राचार्य म्हणून निवृत्त होत आहेत. असे भाग्य फारसे कोणाला लाभत नाही. मुलगी शिकली तर प्रगती झाली हा सुविचार त्यांनी प्रत्यक्षात अमलात आणल्याचे ते म्हणाले.
प्राध्यापक सुनीता कचरे यांनी हिरे यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. पिंपळगाव बसवंत, वणी व देवळाली कॅम्प कॉलेजमध्ये काही वर्ष सेवा केल्यानंतर १९९० पासून त्या सिन्नर महाविद्यालयात कार्यरत असल्याचे त्या म्हणाल्या. सिन्नर नगरपरिषदेच्या नगरसेवक पद व पाणी पुरवठा सभापती पद भूषविलेल्या हिरे यांनी महाविद्यालयात हजारो विद्यार्थी घडवले. वाणिज्य विभागाचे प्रमुख पद मिळाल्यांनतर उपप्राचार्य पदही त्यांच्याकडे चालत आले. माजी विद्यार्थिनी तर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य हा त्यांचा प्रवास सर्वांनाच प्रेरणादायी ठरणारा असल्याचे प्रा. चंद्रशेखर बर्वे म्हणाले. यावेळी भाऊसाहेब तिडके, डगळे यांच्यासह प्राध्यापक वृंद उपस्थित होते.