सिन्नर –जिल्ह्यात सर्वाधिक पिण्याच्या पाण्याचे टँकर लागणारा तालुका म्हणून शासन दरबारी वर्षानुवर्ष नावलौकिक मिळवलेला सिन्नर तालुका गेल्या दोन वर्षांपासून टँकरमुक्त बनला आहे. ‘युवा मित्र’, ‘टाटा ट्रस्ट’, ‘ए. टी. ई. चंद्रा फाउंडेशन’ व ‘महाराष्ट्र शासन’ यांच्या सहकार्यातून गेल्या ४ वर्षात राबवलेल्या ‘जलसमृद्धी’ अभियानामुळे ही किमया साधली आहे. याअभियानामुळे तालुक्यातील भूजल पातळीत वाढ झाली असून तालुक्यातील गावांसह वाड्या-वस्त्यांवरील विहिरींना भरउन्हाळ्यातही पाणी राहू लागले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करण्याची वेळ कुणावरही येत नाही.तालुका टँकर मुक्त बनल्याने त्यावर दरवर्षी होणाऱ्या करोडो रुपयांच्या खर्चाचीही बचत झाली आहे.
तालुक्यात भोजापूर(३३० दश लक्ष घनफूट) हे एकमेव मोठे धरण असून हे धरण वगळता कोनांबे, ठाणगाव, सरदवाडी या छोट्या धरणांसह ८४ गावांमधील १८२ पाझरतलाव, सिमेंट नाला बांध, छोट्या नाल्यांमधला २३ लाख ६ हजार क्युबीक मीटर गाळ शेतकऱ्यांना सोबत घेऊन संस्थेने नियोजनबद्ध रित्या काढण्यात यश मिळवले. त्यातून तालुक्याची पाणी साठवण क्षमता ८१.४३ दशलक्ष घनफुट अर्थात २३०६ टी.सी. एम. ने वाढली. या कामामुळे या सर्व गावांमधील जवळपास ३७०० विहिरी चार्ज(पुर्नभरण) झाल्या तर काढलेला गाळ शेतकऱ्यांनी स्व:खर्चाने नेत १७१९ एकर पडीक जमीन सुपीक बनवली.









