सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सह्याद्री युवा मंच व जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथे एक डिसेंबर पासून चार दिवस पुरुष व महिलांचे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा व जिल्हास्तरीय केसरी कुस्ती स्पर्धा भरविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर विख्यात कलाकारांचे मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सह्याद्री युवा मंचचे संस्थापक उदय सांगळे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जयंत जाधव यांनी दिली.
असोसिएशनचे कार्यवाह मोहन गायकवाड, कोषाध्यक्ष बाळासाहेब जाधव, संयुक्त कार्यवाह सतीश सूर्यवंशी, सदस्य वाल्मीक बागुल, शरद पाटील, क्रीडा संघटनेचे तालुकाध्यक्ष किरण मिठे, रामनाथ जाधव ज्ञानेश्वर नवले, किरण राठोड सोमनाथ काळे, सुदाम कराड आदी उपस्थित होते. माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शितल सांगळे या हे स्पर्धेचे स्वागतोत्सुक आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एक डिसेंबरला दुपारी चार वाजता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दुसऱ्या दिवशी दोन डिसेंबरला दुपारी तीन वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत कबड्डी सामन्यांचा थरार आडवा फाटा येथील मैदानावर पहावयास मिळणार आहे. त्यासाठी चार मैदानी तयार करण्यात आली आहेत. क्रीडा प्रेमींना एकाच वेळी चार सामन्यांचा थरार पहावयास मिळेल. ७००० क्रीडाप्रेमी बसू शकतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली सामान्यानंतर हास्य जत्रा हा प्रसिद्ध कार्यक्रम पहावयास मिळेल. तीन डिसेंबरला कबड्डीचे साखळी सामने पहावयास मिळतील सायंकाळी सातला स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यावेळी कवी संमेलनाचाही लाभ घेता येणार आहे. त्याचप्रमाणे कोविड काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांतील व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. ४ डिसेंबरला अंतिम सामाने पहावयास मिळतील. महाराष्ट्राची परंपरा दर्शविणाऱ्या महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रमही पहावयास मिळेल. याच वेळी विजेत्या संघांना गौरविण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री भारतीय पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार हेमंत गोडसे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. कबड्डी बरोबरच कुस्ती सामनेही पहावयास मिळणार आहेत. यशस्वी मल्लांची राज्यस्तरासाठी निवड केली जाणार आहे. क्रीडा प्रेमींसाठी ही पर्वणी असून कबड्डी व कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन उदय सांगळे, जयंत जाधव यांनी केले आहे.
सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे लोकार्पण
गुरुवार दि एक डिसेंबर रोजी अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रबोधिनीत मातीच्या आखाड्यातील कुस्ती, मॅटवरील कुस्त्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर खेळाडूंसाठी जिम उभारण्यात आली आहे. क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी आदी खेळांचा सरावही प्रबोधिनीत करता येणार आहे. प्रबोधिनी उभारण्यासाठी अनेक मान्यवरांनी मदत केली आहे. तालुक्यात गुणवत्ता पूर्ण खेळाडू घडवण्यासाठी प्रबोधिनी सुरू करण्यात आल्याची माहिती मंचचे संस्थापक उदय सांगळे यांनी दिली.
५०० खेळाडूंचा सहभाग
कबड्डी स्पर्धेत ५०० खेळाडूंचा सहभाग राहणार आहे. त्यांच्या निवासाची सर्व सुविधा करण्यात आली आहे. स्पर्धेत कार्पोरेट संघही उतरणार आहेत. ८८ साखळी सामने यावेळी होतील. पहिले बक्षीस एक लाख, दुसरे ७५ हजार, तिसरे व चौथे बक्षीस ५१ हजाराचे आहे. याव्यतिरिक्त आणखी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. महिलांसाठी पहिल्या विजेत्या संघात ५१ हजार दुसरे बक्षीस ४१ हजार रुपये, तिसरे व चवथे ३१ हजार रुपयांचे आहे. कुस्ती स्पर्धेसाठी ३ डिसेंबरला वजने घेण्यात येणार असून चार डिसेंबरला सामने होणार असल्याचे उदय सांगळे, जयंत जाधव यांनी सांगितले.