अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सिन्नर – घोटी महामार्गावरील घोरवड घाटात गुरुवारी रात्री दीड ते दोन वाजेच्या दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन दोनशे फूट खोल दरीमध्ये कोसळून एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. अपघात झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. रात्री सिन्नरकडून घोटी कडे जाणारी टाटा टियागो या कंपनीची कार एम एच १५ जी एल २७४५ ही सिन्नर घोटी रोडने जात असतांना घोरवड घाटामध्ये वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दोनशे फूट खोल दरी मध्ये गेली. कार मध्ये बसलेले अंकुश संतु जमदाडे (वय ३८) रा. आवळी , तालुका इगतपुरी,अनिल गोपाळ भोर रा. राय गोंदे ,तालुका इगतपुरी ,नामदेव किसन धांडे रा. भगूर, हे प्रवाशी या गाडीत बसले होते. अपघातानंतर अनिल भोर व नामदेव धांडे हे जखमी अवस्थेत खोल दरीतुन वरती आले. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती सिन्नर पोलिसांना दिली. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, सुदाम धुमाळ, पोलीस नाईक विनायक आहेर, नवनाथ शिरोळे रवींद्र चिने आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच ॲम्बुलन्सचे चालक पुरुषोत्तम भाटजीरे व शुभम कातकडे या दोघांनी खाली दरीत जाऊन अंकुश संतु जमदाडे यांना वरती आणले. त्यानंतर त्यांना सिन्नर ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. या अपघाताचा पुढील तपास सिन्नर पोलिस करीत आहे.