सिन्नर : शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात बुधवारी सायंकाळी सुमारास वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. या वादळी पावसात शिर्डीरोड लगत शेडची भिंत अंगावर पडल्याने शेतकरी वृध्दाचा मृत्यू झाला. नारायण हरिभाऊ गवळी (६२) असे मृताचे नाव आहे. राज्यात मान्सून दाखल होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना सिन्नर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पाऊस सुरु झाल्याने येथील गवळी मळ्यात नारायण गवळी हे गोऱ्हा सोडून अन्यत्र बांधण्यासाठी गेले होते. त्याचवेळी वादळी वाऱ्याने शेडची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. त्यात ते गंभीर जखमी झाले. गवळी कुटूंबीयांनी तत्काळ त्यांना उपचारांसाठी खासगी दवाखान्या दाखल केले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशाल गवळी यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली. सिन्नर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक रामदास धुमाळ पुढील तपास करीत आहेत.