सिन्नर – वारंवार पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांचे कांद्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करून बाजार समितीचे सभापती, सचिव, संचालक मंडळ यांच्यासह संबंधित कांदा व्यापारी यांनी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक पिळवणूक केली असून येत्या आठ दिवसांत बाजार समितीने शेतकऱ्यांच्या कांद्याचे सर्वच्या सर्व थकीत पैसे अदा न केल्यास संबंधित कांदा उत्पादक शेतकरी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच उपोषण करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी आज दिला
गेल्या दोन वर्षांपूर्वी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत श्री माऊली तुपे आणि कंपनी या फर्मच्या माध्यमातून कांदा व्यापारी दिपक तुपे यांनी शेतकऱ्यांचा लिलाव पद्धतीने खरेदी केलेल्या कांद्याच्या रकमेपैकी काही शेतकऱ्यांनचे सुमारे ६० ते ७० लाख रूपये अजूनही न दिल्याने संतप्त कांदा उत्पादकांनी आज सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती कार्यालयात धडक देत प्रशासक व सचिव यांना लेखी पत्र देऊन आक्रमक भूमिका घेतली. यावेळी तालुक्यातील वेगवेगळ्या गावांतील कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
बाजार समितीने व्यापार्यास पाठीशी घातले
दोन वर्ष होऊनही आणि शेतकऱ्यांनी सतत बाजार समितीत, सभापती ,सचिव संचालक मंडळ यांच्याकडे पाठपुरावा करूनही थकवलेल्या रकमेपैकी मोजक्याच शेतकऱ्यांचे थोडेफार पैसे देऊन व्यापाऱ्याने संपूर्ण पैसे देण्यास चालढकल करत असतांना बाजार समितीने मात्र फक्त बघ्याची भूमिका घेऊन शेतकर्यांऐवजी व्यापाऱ्यालाच मदत केल्याचा आरोप या वेळेस कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिघोळे यांच्याकडे केला.
संपूर्ण रक्कम न मिळाल्यास टाळे ठोकू
येत्या आठ दिवसांत संबंधित श्री दिपक तुपे यांच्याकडून सर्वच्या सर्व शेतकऱ्यांचे पुर्ण थकीत पैसे अदा न केल्यास बाजार समितीला टाळे ठोकून संपूर्ण लिलाव प्रक्रिया बंद केली जाईल असेही दिघोळे यांनी यावेळी सांगितले.
लोकप्रतिनिधींनीही केले दुर्लक्ष
श्री दिपक तुपे यांच्याकडे कांद्याचे लाखो रुपये अडकलेल्या शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे तसेच माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे आपली कैफियत मांडली परंतु संबंधित आजी माजी लोकप्रतिनिधीनींही शेतकर्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. संतप्त शेतकऱ्यांकडून बाजार समितीचे सचिव विजय विखे यांना वरिल विषयाचे लेखी पत्र देण्यात आले यावेळी दत्ता डोमाडे, जनार्दन सोनवणे, लक्ष्मीबाई घुगे, पोपट सिरसाठ, सोमनाथ उगले, तानाजी मापारी, प्रल्हाद गुरुळे, भागवत दुधाटे, नामदेव आव्हाड, विशाल शिरसाट, गोविंद उगले, माणिक काळे, किरण माळी, शरद सोनवणे, अनिल भाबड, सोमनाथ सोनवणे, अनिल आंधळे, सोमनाथ पवार, सुखदेव गुंजाळ आदी शेतकरी उपस्थित होते.