सिन्नर – तालुक्यातील सायाळे येथे आज (दि.२९) सायंकाळी ५.३० च्या दरम्यान वीज पडल्याने एका युवतीसह दोघे जण ठार झाल्याची घटना घडली. सायाळे येथील भागवत जगन्नाथ लांडगे हे मुलगी प्रियंका (२२) व साडू बाळासाहेब परभत रहाणे (५०) रा. चंदनापुरी ता. संगमनेर हे लांडगे यांच्या उसाच्या शेतीत नींदनीचे काम करत होते. अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आणि ५०-६० फुटावर असलेल्या बाभळीच्या झाडावर वीज कोसळली. त्या धक्क्याने तिघेही तिघेही फेकले गेले व बेशुद्ध पडले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना तातडीने सिन्नर येथील शिवाई हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच दोघे मृत असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले तर लांडगे यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले.
मयत प्रियंका ही इंजिनियर झाली असून पुण्यातील वोडाफोन कंपनीत काम करत होती. घरी आल्यानंतर आई-वडिलांना शेतीत मदत करण्याचे काम ती नेहमी करत असे. आताही शेतीत मदत करण्यासाठी गेली असताना काळाने तिच्यासह काकावर झडप घातली.
मयत प्रियंकाने कोपरगाव येथील संजीवनी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये information Technology या शाखेत पदविका मिळवल्यानंतर कॅम्पस इंटरव्यूमध्ये तिला मोठ्या पगाराची नोकरी लागली होती. ती नाकारून तिने बी.ई. पूर्ण केले होते व नुकतीच ती पुण्यात नोकरीला लागली होती. तिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.