सिन्नर – तालुक्यात शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास विजांचा गडगडाटसह तुरळक पावसाने काही ठिकाणी हजेरी लावल्याने शेतकरी व नागरिकांची धावपळ झाली. सकाळी अतीउष्णता व दुपारी जोराचा वारा व त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह पाऊस यामुळे वातावरणातील या बदलाचा शेतीला फटका बसला आहे. शेतात साठवलेले कांदा, गहू ,ज्वारी, द्राक्ष पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान या लहरी हवामानामुळे होऊ शकतो म्हणून शेतकरी मेटकुटीस आलेले आहेत. सिन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी आलेल्या अचानक पावसाने सगळयांची धावाधाव झाली. अगोदरच अनेक पिकांना भाव नसल्याने शेतकरी संकटात आहे. त्यात आज आलेल्या पावसाने पुन्हा संकट आले आहे. या पावसामुळे शेतकरी, महिला, मजूर यांची पिके झाकण्यासाठी अतिशय धावपळ उडाली. दरम्यान हवामान खात्याने अजून चार दिवस काही ठिकाणी जोराचा पाऊस तर काही ठिकाणी विजेचा गडगडाट असल्याचे सांगितले आहे.