सिन्नर – तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे मनमाड येथे पोलीस दलात कार्यरत असलेल्या सुरज उगलमुगले याने सासुरवाडीत आपल्या पत्नीसह सासू-सासऱ्यावर चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या घटनेनंतर तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान सासरे निवृत्ती सांगळे यांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे.
शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सुरज उगलमुगले एका साथीदाराला सोबत घेऊन कारमधून शेळके वस्तीवरील सांगळे यांच्या घरी आल्यानंतर ही घटना घडली. सासरी घरी आल्यानंतर उगलमुगले यांनी पत्नी पूजाला तुला काल नाशिकला यायला सांगितले होते का आली नाहीस असे विचारत भांडण उकरून काढले. या भांडणातच त्याने चाकूने पत्नीवर वार केले. यावेळी पूजाला व तिच्या बाळाला वाचवण्यासाठी सासू शीला सांगळे भांडणात पडल्या. त्यांच्यावरही सुरजने मानेवर व हातावर चाकूने वार केले. त्यानंतर सूरजने निवृत्ती सांगळे यांच्यावरही चाकूने वार केले. यात तिघेही गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर उगलमुगले व त्याच्यासोबत आलेला साथीदार येथून फरार झाले.
ही घटना वस्तीत कळाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी जखमी अवस्थेतील तिघांनाही दोडी ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, अतिरक्तस्राव होत असल्याने तिघांनाही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सासरे निवृत्ती सांगळे यांचा मृत्यू झाला असून, शिला सांगळे व पूजा उगलमुगले यांची तब्बेत गंभीर आहे.
सात महिन्यांचा मुलगा
पोलीस सेवक सुरज उगलमुगले याचा दोडी बुद्रुक येथील निवृत्ती दामोदर सांगळे व शिला निवृत्ती शिंदे यांची मुलगी पूजा हिच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना सात महिन्यांचा मुलगा असून दोघे पती-पत्नी उपनगर नाशिक येथे वास्तव्यास आहेत. गेल्या आठवड्यात गुढीपाडव्याच्या सणासाठी बाळासमवेत पूजा दोडी येथे माहेरी आली होती. त्यानंतर ही घटना घडील