सिन्नर – ग्रामीण भागात सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी ग्रामविकास विभागाकडून मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत सामाजिक सभागृहे, दशक्रियाविधी शेडसह विविध विकास कामांना ३ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर करून आणला आहे. अनेक गावांमध्ये दशक्रिया विधीच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांना निवाऱ्यासाठी पुरेशी जागा नसते. त्यामुळे पावसाळ्यात प्रचंड हाल होतात.अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास पुरेशी व्यवस्था नाही.त्यामुळे अनेक गावांत सार्वजनिक सभागृह बांधण्याची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे करण्यात आली होती.त्यानुसार आमदार कोकाटे यांनी ग्रामस्थांच्या गरजा लक्षात घेऊन ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागातील सुचवलेल्या पायाभूत व मुलभूत सुविधा पुरविणे योजनेंतर्गत कामांची मागणी केली होती.त्यानुसार अनेक कामांना निधी मंजूर करण्यात आला आहे.
ही कामे होणार….
दशक्रिया विधी शेड बांधकाम पुढील गावांत होणार असून त्यात दातली (१० लाख), दुशिंगवाडी (१० लाख),शहा (२० लाख), वावी (२० लाख), कणकोरी (१० लाख) या प्रमाणे निधी मंजूर झाला आहे.सामाजिक सभागृह बांधकाम पुढील गावांना मंजूर झाले आहे.पांगरी(५०लाख) पाटपिंप्री (१० लाख),नळवाडी चिंचबनवाडी (१० लाख),ठाणगाव घुलेवाडी (१०लाख),नांदूरशिंगोटे एकलव्य नगर (२० लाख),चापडगाव टीव्हीनगर (१० लाख), सोनेवाडी मेंगाळवाडी(१० लाख),कोमलवाडी (२५ लाख),कहांडळवाडी (२५ लाख),पंचाळे (२५ लाख),सायाळे (२५ लाख), नायगाव (२५ लाख) तर ब्राह्मणवाडा येथे अभ्यासिका बांधकाम करणे १५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.त्यामुळे संबंधित गावांतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
वडांगळीत साकारणार शिवसृष्टी…..
अनेक गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बांधले जात आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत व अभिमान आहेच,मात्र त्याचबरोबर त्यांनी बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती.त्यामुळे सर्व समाजाचे संत व महत्त्वाच्या व्यक्तींच्या कार्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यासोबत समाजापुढे आणण्यासाठी उत्तमराव खुळे,खंडेराव खुळे व कैलास खुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार कोकाटे यांच्याकडे शिवसृष्टीची संकल्पना मांडून त्यासाठी निधी मंजूर करून देण्याची मागणी केली होती.त्यानुसार आमदार कोकाटे यांनी त्यासाठी २० लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे.कामाच्या आवश्यकतेनुसार आणखी निधी मिळणार आहे.शिवसृष्टीतून प्रथमच विविध समाजात महत्वाचे स्थान असणाऱ्या संतांच्या कार्याचा गौरव होणार असल्याने जनभावनेचा आदर करून यासाठी आघाडी घेणाऱ्या संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांनी आता निधी मंजूर झाल्याने तिच्या पूर्णत्वासाठी झोकून देऊन काम करावे व जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट शिवसृष्टी साकारावी अशी अपेक्षा ग्रीन व्हिजन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांनी व्यक्त केली आहे.