सिन्नर – औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी रस्ते दुरुस्ती आवश्यक असून त्यासाठी निधी मिळावा म्हणून अशासकीय प्रशासक मंडळाच्या अध्यक्षा सुधा माळोदे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याची दखल घेत आमदार कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अशासकीय प्रशासक मंडळाची बैठक लावून औद्योगिक वसाहतीचा पाणीप्रश्न आणि रस्त्यांचा प्रश्न निकाली लावण्याची मागणी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने पाण्याचा प्रश्न निकाली काढल्यानंतर औद्योगिक वसाहतीस वाढीव पाणीपुरवठा होऊ लागल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई मिटली होती. रस्त्यांचा प्रश्नही अल्पावधीत मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्याची दखल घेत त्यांनी उद्योग, उर्जा व कामगार विभागाला आदेश दिल्यानंतर औद्योगिक वसाहतीमधील ९ मीटर रुंद आणि ९२० मीटर लांबी, त्याचप्रमाणे ७ मीटर रुंद आणि १०२० मीटर लांब रस्त्याचे एलबीएमने खड्डे भरणे त्याचप्रमाणे अंतिम डांबरीकरण अंतर्गत ५०० मिमी. बीएम व २५ मिमी. एसी व साईड पट्टी मुरुमाने भरणे या कामासाठी ९९ लाख ५६ हजार २०० रुपयांचा निधी मंजूर केला. विशेष म्हणजे या कामासाठी औद्योगिक वसाहतीच्या हिस्स्याची २५ टक्के रक्कम कार्यान्वयन यंत्रणेकडे यापूर्वीच प्राप्त झाल्याने या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
अशासकीय प्रशासक मंडळाच्या अध्यक्षा सुधा माळोदे, उपाध्यक्ष नारायण पाटील, सदस्य संजय शिंदे आदींनी सातत्याने औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सातत्याने आमदार कोकाटे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. कोकाटे यांनी त्याची तातडीने दखल घेऊन शासनदरबारी हा प्रश्न निकाली काढल्याने उद्योजकांनी समाधान व्यक्त केले आहे.
आमदार माणिकराव कोकाटे यांचे अथक प्रयत्नातून व अध्यक्षा सौ. सुधा (गडाख )माळोदे उपाध्यक्ष नारायण पाटील सदस्य संजय शिंदे त्याचप्रमाणे माजी संचालक श्री अविनाश तांबे , पंडीत लोंढे, रामदास दराडे , सुनिल कुंदे , मिनाक्षी दळवी , यांच्या सहकार्याने अनेक वर्ष प्रलंबित रस्त्याच्या कामाची मंजुरी सरकार कडून मिळालेली आहे लवकरच रस्त्याची कामे सुरू होणार आहे