सिन्नर – पेट्रोल आणण्यासाठी रिकामी बाटली सोबत घेऊन आलेल्या एका भामट्याने शेजारच्या दुकानदाराने तुमची मोटारसायकल सांगितली असे म्हणत दुचाकी मालकाच्या डोळ्यासमोर चावी घेऊन दुचाकी लांबविल्याची घटना नवा पुल परिसरात घडली. सरस्वती पुलावर बिल्कीस वसीम सैय्यद यांचे चिकनचे दुकान आहे. सकाळी पावणेदहाच्या सुमारास एक युवक त्यांच्या दुकानावर आला. शेजारच्या कजरी मिठास वाल्याने पेट्रोल आणण्यासाठी तुमची मोटारसायकल मागितली आहे असे सांगत तो त्यांच्याकडे त्यांच्या अॅक्टीव्हा क्र. एम. एच. 15/ एच. व्ही. 1557 ची चावी मागू लागला. सैय्यद यांनी त्या भामट्याला चावी देण्यास नकार दिल्यानंतर तो माघारी परतला. थोड्याच वेळात तो फोनवर बोलत आला. भाभी चावी देत नसल्याचे तो फोनवर बोलत होता. कजरीवाला भैय्या बोलत असल्याचे सांगून त्याने पुन्हा चावी मागितली. त्यामुळे सैय्यद यांना खरंच कजरी मिठासवाला दुकानदार फोनवर बोलत असावा असा समज झाला. दुकानावर गर्दी असल्याने त्यांनी दुचाकीची चावी त्याच्या हातात दिली. त्यानंतर भामट्याने सैय्यद यांची दुचाकी घेऊन पोबारा केला. एक तासानंतर दुकानावरील गर्दी कमी झाल्यानंतर बिल्कीस यांना अजून पेट्रोल घेऊन तो व्यक्ती का आला नाही असा संशय आल्याने त्यांनी कजरी मिठासच्या दुकानावर जाऊन मोटारसायकल अजून परत का आली नाही असे विचारले. त्यावेळी कजरी मिठासच्या दुकानमालकाने आपण कोणालाच गाडी नेण्यासाठी सांगितले नसल्याचे म्हटले. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे सैय्यद यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याच्या विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात येत फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हवालदार राहुल निरगुडे अधिक तपास करीत आहेत.
सोन्याची पोत केली लंपास
शहरातील वावी वेस परिसरात पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत पल्सर दुचाकीवरील चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवार रात्री ८.१५ च्या सुमारास घडली.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, लोंढे गल्लीत वास्तव्यास असलेल्या संगीता घनश्याम घरटे (४८) ही महिला रस्त्याने पायी जात असताना पल्सर दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी घरटे यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत ओढून पोबारा केला. घरटे यांनी आरडाओरड केली, मात्र चोरटे हाती लागले नाही घरटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, सिन्नर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
—