सिन्नर – तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या तीन जलसंधारण योजनांना आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून जिल्हा वार्षिक योजनेतून पुनर्भरण योजनेअंतर्गत १ कोटी २८ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. ज्याद्वारे उपसा सिंचन होऊन सुमारे २०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. कीर्तांगळी येथील आगनमळा व पाडळी येथील शिंदेंमळा या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी मार्च महिन्यापासून पाण्याची टंचाई जाणवते.त्यामुळे या टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली होती.जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे करुन त्यानुसार आमदार कोकाटे यांना उपाययोजना सुचविल्या होत्या.म्हाळुंगी नदीत जॅकवेल घेऊन त्यातील पाणी मोटरपंपद्वारे उपसा करून ते शिंदेमळा बोगीरवाडी येथील पाझर तलावात सोडण्यात येणार आहे.त्याद्वारे परिसरातील विहिरिंचे पुनर्भरण होणार आहे.त्यातून ५० हेक्टरहुन अधिक क्षेत्र ओलिताखाली राहणार आहे.त्यासाठी ४० लाख ५५ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.कीर्तांगळी येथील आगनमळ्यातील बंधाऱ्यात देवनदीवरील कोटा बंधाऱ्यातून उपसा सिंचन पद्धतीने पाणी उचलून सोडण्यात येणार आहे.त्याद्वारे आगनमळ्यातील बंधारा भरून पुढे नाल्याद्वारे पाणी कासारनदीवरील बंधाऱ्यात पोहचेल.यातून सुमारे ५० हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.यासाठी ४७ लाख ९ हजार रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. वडांगळीच्या सरस्वतीला संजीवनी… वडांगळी येथे तामसवाडीहून गोदावरी नदीतून माजी आमदार स्व.सूर्यभान गडाख यांनी सरस्वती उपसा जलसिंचन योजना नावाची संस्था शेतकऱ्यांच्या सहभागातून सहकारी तत्वावर सुरू केली.पुढे ह्या योजनेला आमदार माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून अनेकदा संजीवनी मिळाली.साधारणपणे ६ वर्षांपूर्वी जिल्हा बँकेच्या माध्यमातून ह्या योजनेचे नूतनीकरण करण्यास आमदार माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना भरीव कर्ज मंजूर करून दिले.साधारणपणे दोन ते सव्वा दोन कोटींची ही योजना काही शेतकऱ्यांनी वेळेत पैसे न दिल्याने व काही ठिकाणी योजनेची पाईपलाईन नेण्यास विरोध झाल्याने वेळेत पूर्ण होऊ शकली नाही.त्यातून वाढत्या महागाईमुळे आहे त्या रकमेत योजनेचा खर्च भागेना.त्यासाठी आणखी निधीची आवश्यकता असल्याने आमदार माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा ह्या सिंचन योजनेच्या मदतीला धावत जाऊन अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ४० लाख ३५ हजार रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.त्यामुळे १०० हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. नाविन्यपूर्ण कामे होणार.. पाडळी व कीर्तांगळी येथील बंधाऱ्यांत थेट उपसा सिंचन पद्धतीने पाणी सोडण्यात येईल.शिवाय तालुक्यात प्रथमच सहकारी तत्त्वावरील उपसा सिंचन योजनेला शासनाकडून निधी मंजूर करून घेण्यात आला आहे.तिन्ही प्रकारची कामे तालुक्यात प्रथमच होत आहे.शेतकरी हितासाठी अशा प्रकारची नाविन्यपूर्ण कामे तालुक्यात प्रथमच होत आहे. माणिकराव कोकाटे, आमदार सिन्नर अनेक वर्षांचा प्रश्न सुटला.. कीर्तांगळी येथील देवनदीतून आगनमळ्यातील बंधाऱ्यात उपसा सिंचन पध्दतीने पाणी सोडण्याची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे अनेक वर्षांपासून आम्ही शेतकरी करत होतो.आता त्यास मंजुरी मिळाल्याने अनेक वर्षांचा प्रश्न सुटून शेतकऱ्यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले जाणार आहे. संपत चव्हाणके व लक्ष्मण चव्हाणके शेतकरी कीर्तांगळी