सिन्नर – केंद्र सरकारच्या या शेतकरी- कामगार विरोधी कायद्यांचा व धोरणांचा निषेध करण्यासाठी बुधवारी सर्व कंपनीतील कामगारांनी आपापल्या शिफ्ट नुसार कंपनीच्या गेटजवळ जमून काळे झेंडे दाखवून व काळा दिवस पाळून शेतकरी- कामगार विरोधी कायद्यांचा व धोरणांचा निषेध केला.सर्व कामगारांनी गेटवर सोशल डिस्टन्स ठेवून तोंडाला मास्क लावून आंदोलन केले. या आंदोलनात शेतकरी आणि कामगार विरुद्ध केलेल्या कायद्यांचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या.
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले तीन कायदे, कामगार विरोधी केलेल्या चार श्रम सहिता मागे घ्या या मागणीसाठी अनेक आंदोलने केली. तरीदेखील सरकार हे कायदे मागे घेण्यास तयार नाही. शेतकऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन सुरू केले या आंदोलनाला २६ मे रोजी ६ महिने पूर्ण झाले आहेत. तरी देखील केंद्र सरकार हे कायदे मागे घेण्यास तयार नाही ते कायदे मागे घ्यावेत अशी मागणी सुध्दा यावेळी करण्यात आली.
यावेळी कॉम्रेड देविदास आडोळे यांची तडीपारी मागे घ्या अशी घोषणा देण्यात आली. या आंदोलनात माळेगांव व मुसळगांव एमआयडीसी मधील अनेक कंपनीतील कामगार सहभागी झाले.