सिन्नर – सिन्नर सार्वजनिक वाचनालयाची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी वाचनालयाच्या सभागृहामध्ये पार पडली. वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत सभेच्या अध्यक्षस्थानी होते. श्री. सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून सभेच्या कामकाजास सुरूवात करण्यात आली. उपस्थित सभासदांचे स्वागत व सूत्रसंचालन जितेंद्र जगताप यांनी केले. अहवाल काळातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा ठराव संचालक जितेंद्र जगताप यांनी मांडला. मागील वार्षिक सभेचे इतिवृत्ताचे नरेंद्र वैद्य यांनी वाचन केल्यानंतर त्यास मंजुरी देण्यात आली. वाचनालयाच्या सरत्या वर्षाचा अहवाल कृष्णाजी भगत यांनी मांडला. सरत्या वर्षाचा ताळेबंद व नफा-तोटा पत्रके संचालक चंद्रशेखर कोरडे यांनी मांडली. सन २०२०- २१ च्या उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक संचालक सुनित उगले यांनी मांडले त्यासही सभेमध्ये मंजूरी देण्यात आली. हेमंत वाजे यांनी अंर्तगत लेखपरिक्षकाच्या निवडीचा ठराव मांडला. तसेच नगरपरिषदेने वाचनालयास चालू वर्षी ७० हजार रू.अनुदान दिल्या बद्ल नगरपरिषदेचा अभिनंदनाचा ठराव मांडला. वाचनालय यंदाच्या वर्षी अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असून त्यानिमित्त वाचनालयात विविध स्पर्धाचे आयोजन वर्षभरात केले जाणार आहे. यात रांगोळी स्पर्धा, कवी संमेलन, वकृत्व स्पर्धा, व्याख्यानमाला, गीत संगीताचे, मनोरंजनाचे कार्यक्रम साजरे होणार आहे असे कृष्णाजी भगत यांनी सांगितले तसेच वाचनालय स्मरणीका तयार करीत आहे. या स्मरणीकेत लेख व जाहिराती जमा करण्याचे काम सुरू आहे. सर्व सभासदांनी वाचनालया संदर्भातील लेख व जाहीराती जमा करण्याचे आवाहन यावेळी भगत यांनी केले.
सभासदांनी सभेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची अध्यक्ष कृष्णाजी भगत व कार्यवाह हेमंत वाजे यांनी समाधानकारक उत्तरे देवून त्यांचे समाधान केले. उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले. सभेस दिवाकर पवार, राजाराम मुंगसे, पी. एल. देशपांडे, योगानंद गवळी, निर्मलाताई खिंवसरा, नामदेव कोतवाल, शामसुंदर झळके, ताराचंद्र खिंवसरा, गोविंद मोरे, अजय शिंदे, धनंजय मुळे, बाळासाहेब हांडे, मनोज भंडारी, बाबासाहेब कलकत्ते, श्रीराम क्षत्रिय, व्ही.एस. सांगळे आदीसह अनेक सभासद उपस्थित होते