सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुकतील ना गरिकांचे १०० टक्के लसीकरण करण्यासाठी व येणाऱ्या काळात पुन्हा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊ न देण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज झाले असून लसीकरणाशिवाय हॉटले, दुकाने, सिनेमागृहे अशा गर्दी होणाऱ्या ठिकाणी प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी विशेष पथकामार्फत तपासणी होणार असल्याची माहिती प्रांतधिकारी डॉ. अर्चना पठारे यांनी दिली.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सिन्नर तालुक्यात आतापर्यंत एकुण २३ हजार ५४५ व्यक्ती बाधीत झालेल्या आहे. त्यापैकी ५२३ व्यक्तींचा मृत्यु झालेला आहे. ही पार्श्वभुमी विचारात घेवुन तालुक्यातील सर्व नागरीकांचे लसीकरण पुर्ण करण्यासाठी डॉ. पठारे यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात सर्व शासकीय विभागांची बैठक घेण्यात आली. यावेळी १०० टक्के नागरीकांचे लसीकरण करण्याबाबत नियोजन करुन कार्यवाही करण्याच्या सुचना त्यानी अधिकाऱ्यांना दिल्या. १ मार्च २०२२ रोजीच्या आदेशानुसार पहिला डोस ९० टक्के व दुसरा डोस ७० टक्के पुर्ण झाला नसल्याने नाशिक जिल्हयाचा समावेश अ- वर्गाच्या यादीत झालेला नाही. त्यानुसार सर्व आस्थापनामध्ये काम करणाऱ्या सर्व सेवकांचे लसीकरण होणे अनिवार्य आहे. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था वापरण्यासाठी तसेच मॉल, सिनेमागृह, नाटयगृह, पर्यटनस्थळे, रेस्टॉरंट, धार्मिकस्थळे इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी लसीकरण पुर्ण झालेले असने बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व शासकीय निमशासकीय व खाजगी कार्यालय, औद्योगिक आस्थापनामध्ये काम करणाऱ्या सेवकांचे लसीकरण झाले असल्याबाबत संबधीत आस्थापना प्रमुखाने खात्री करणे आवश्यक आहे. 100 टक्के नागरीकांना लसीकरण करणेबाबत डॉ. पठारे यांनी गाव निहाय आढावा घेतला. ज्या गावांमध्ये व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे त्याठिकाणी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, स्वस्त धान्य दुकानदार व ग्रामस्तर समिती यांच्या माध्यमातुन जनजागृती करुन नागरीकांना लसीकरण करुन घेणेबाबत आवाहन करण्याबाबतच्या सुचनाही त्यांना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना विद्यालयातच लसीकरण करण्याबाबत नियोजन करण्यात आले. यावेळी तहसिलदार राहुल कोताडे, मुख्याधिकारी संजय केदार, तालुका आरोग्य अधिकारी मोहन बच्छाव , गटशिक्षण अधिकारी मंजूषा साळुंखे, वैद्यकीय अधिकारी प्रशांत खैरनार व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
२४ पासून अंमलबजावणी
हॉटेल्स, मॉल्स, दुकाने, कार्यालये या ठिकाणी लसीकरण केलेल्या नागरीकांनाच प्रवेश देण्यात येत असल्याबाबत खात्री करणेकामी पथक नेमुणक तपासणी करण्याच्या सुचना डॉ. पठारे यांनी केल्या. त्यानुसार दिनांक. गुरुवारपासून (दि. २४) पासुन हे तपासणीचे काम सुरु करण्यात येणार आहे.