सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना महामारीने अनेक चांगली माणसं आपल्यातून गेली. या काळात जीवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी सेवा बजावत असताना अनेक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले. कोरोना महामारीने मृत झालेल्या राज्यातील शासनाच्या सर्व संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावुन घेण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली.
येथील कोतवाल संजय चांगदेव धरम यांचा सेवा बजावत असताना १९ डिसेंबर २०२० रोजी covid-19 ने मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना शासनाच्या धोरणाप्रमाणे ५० लाख रुपये सानुग्रह सहाय्यचा धनादेश आ. कोकाटे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपिठावर प्रांताधिकारी अर्चना पठारे तहसीलदार राहुल कोताडे, जि.प.सदस्या सिमंतिनी कोकाटे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, स्टाइसचे माजी चेअरमन पंडितराव लोंढे, नवनाथ गडाख, संभाजीराजे जाधव आदी उपस्थित होते. तहसीलदार राहुल कोताडे यांनी मनोगतातून संजय धरम या कर्मचाऱ्या बद्दल मनोगतातून व्यक्त केले
संजयच्या आठवणींना उजाळा देत, त्याच्या कुटुंबियांना शासनस्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी आ. कोकाटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संजय धरम यांची पत्नी श्रीमती रंजना संजय धरम, मुलगा भूषण, मुलगी रसिका, आई सरुबाई व वडील चांगदेव धरम यांना शासनाच्यावतीने मंजूर झालेल्या ५० लाख रुपये सानुग्रह सहाय्य निधीचा धनादेश व वस्त्र भेट देण्यात आले. अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, मित्रर नगरपालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार, डॉ. निर्मला गायकवाड, तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे, माणिक गाडे आदींसह कोतवाल संघटनेचे पदाधिकारी, तहसीलमधील कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन अनिल गडाख यांनी केले तर आभार प्रवीण कर्डक यांनी मानले
कोरोना बळी शासकीय सेवकांच्या वारसांना नोकरीसाठी प्रयत्न करणार
आ. कोकाटे म्हणाले कोरोनाच्या प्रादुर्भावापेक्षा भितीमुळे अनेकांचे प्राण गेले. संजय घरमचे मन अगदी हळवे होते. शासकीय सेवेत कर्तव्य बजावत असताना त्यांनी कोतवाल संघटनेचे राज्याध्यक्ष म्हणून काम करत राज्यभरातील कोतवालांना न्याय मिळवून दिला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नसताना संजयने जीवाची पर्वा न करता अनेकांना सहाय्य करुन त्यांचे प्राण वाचवले. मात्र त्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर सर्व सुविधा असतानाही आपण त्याला वाचवू शकलो नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. स्वर्गीय संजय धरम अतिशय प्रामाणिक व सच्चा कार्यकर्ता होता त्याच्या जाण्याने सर्व कर्मचाऱ्यांना व आम्हाला त्याची उणीव अजून पण भासत आहे.