सिन्नर – जलजीवन मिशन योजनेंतर्गत सिन्नर विधानसभा मतदारसंघातील आंबेवाडी व ८ गावे या नळ पाणीपुरवठा योजनेस आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाली असून त्यासाठी सुमारे १९ कोटी रुपये निधी मिळाला आहे.आदिवासी भागातील या गावांना भाम धरणातून थेट पाणी पुरवठा होणार असल्याने सुमारे २५ हजार आदिवासी बांधवांची कायमस्वरूपी पाणी टंचाईतून मुक्तता होणार आहे.
इगतपुरी तालुक्यातील टाकेद गटात असणारी आंबेवाडी व ८ गावे सिन्नर विधानसभा मतदारसंघात येतात.आदिवासी भागात असल्याने या गावांना पाणीपुरवठा योजनांसाठी अनेकदा निधी मिळाला.तथापि पाण्याचे उदभव शाश्वत नसल्याने जानेवारी महिन्यापासून या भागातील ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो.महिला दीड ते दोन किलोमीटर डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी पायपीट करतात. पुरुष मोटारसायकल, बैलगाडी,ट्रॅक्टर यांसारख्या वाहनांचा पाणी वाहण्यासाठी वापर करतात.नव्याने योजना राबविली तरी पाण्याचा शाश्वत उदभव नसल्याने दरवर्षी जानेवारी ते जून-जुलै या सहा-सात महिन्यांसाठी आदिवासी बांधवांची पाण्यासाठी पायपीट होतच राहणार असल्याची जाणीव आमदार माणिकराव कोकाटे यांना झाल्याने त्यांनी कायम स्वरूपी आदिवासी बांधवांची तहान भागविण्यासाठी सिन्नर नगरपालिकेच्या धर्तीवर या गावांनाही थेट धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी भाम धरणातून प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबविण्याचे ठरविले. त्यासाठी जलसंपदा विभागातून पाणी आरक्षण करून घेतले.जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडून तसा सर्व्हे करून घेतला.त्यानंतर प्रस्ताव तयार करून घेत ते मंत्रालयात सादर करण्यात आले.या प्रस्तावास नुकतीच पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंजुरी दिली.१९ कोटी ४ लक्ष रुपयांच्या या योजनेचे काम ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच सुरु होणार आहे.
सौर उर्जेतून योजना चालणार….
९ गावे व त्या गावांच्या ९ वाड्या यांना सुमारे ३० किमीच्या जलवाहिनीने पाणीपुरवठा होणार आहे.तथापि,भाम धरणातून पाणी मोटरपंपद्वारे उचलून ते ८ किमी अंतरावर मांजरगाव येथे बांधण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावर सोडण्यात येणार आहे.पाणी उपसा व जलशुद्धीकरण यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज लागणार आहे.त्यासाठी आमदार कोकाटे यांच्या सूचनेवरून या योजनेत सौर उर्जा संचाची तरतूद करण्यात आली आहे.त्यामुळे वीजबिलाच्या आर्थिक बोजातून ही योजना वाचणार आहे.
या गावांना होणार फायदा …
आंबेवाडी, मांजरगाव, इंदोरे,खडकेद,वासाळी, बारशिंगवे,सोनोशी,मायदरा व आधारवड या गावांसह भामलेवाडी, धानोशी, ठोकळवाडी,घोडेवाडी, काननवाडी,कचरवाडी, राहुलनगर,भोईरवाडी व शिरेवाडी या वाड्यांना ही योजना पूर्ण होताच पुरेसा पाणीपुरवठा होणार आहे.
आदिवासी बांधवांच्या हालअपेष्टा थांबविणार..
धरणांचा तालुका असूनही वर्षातील ६ महिने पाण्यासाठी हाल सोसणाऱ्या आदिवासी बांधवांची यातून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी त्यावर उपाययोजना करतांना शाश्वत पाण्याचा स्त्रोत महत्वाचा असल्याचे लक्षात आले.त्यामुळे भाम धरणातून ह्या योजनेच्या पाण्याचा उदभव मंजूर करून घेतला.आता योजना पूर्ण होताच १२ ही महिने आदिवासी बांधवांना त्यांच्या घरात पाणी मिळणार आहे.
माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर विधानसभा