सिन्नर -तालुक्यातील पाथरे परिसरातील मातोश्री हॉटेलवर अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांच्या पथकाने छापा टाकत साडेबारा हजारांचा देशी – विदेशी दारुचा अवैद्य मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणात हॉटेल चालक रवींद्र देवमन मोकळ (रा. पाथरे) यांच्याविरुध्द वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कागणे यांच्याकडून जिल्ह्यातील अवैध गुटखा, मद्य व अंमली पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री रोखण्यासाठी कारवाईचा धडाका सुरु आहे. त्याअंतर्गत सिन्नरमधील पाथरे शिवारातील हॉटेल मातोश्री येथे अवैध दारुसाठा करुन विक्री होत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.