सिन्नर – आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून सिन्नर तालुक्यात १ कोटी २५ लाख रुपयांतून व्यायाम शाळा बांधकाम व जीम साहित्यास मंजुरी मिळाली आहे .व्यायामाचे वेड असणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणाईला त्यामुळे बळ मिळणार आहे. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये पोलीस किंवा सैन्य भरतीसाठी जाण्याची इच्छा असते.तथापि अशी इच्छा असणाऱ्या तरुणांना व्यायाम साहित्याची उणीव भासते. त्यामुळे व्यायामाची आवड असणाऱ्या युवकांची गैरसोय होते. ही गोष्ट हेरून ग्रामीण भागात व्यायाम शाळा बांधकाम करण्यासाठी व जिथे व्यायाम शाळा आहे. तेथे व्यायाम साहित्य देण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा क्रीडाविभागास शिफारस केली होती. त्यानुसार सिन्नर तालुक्यात १० गावांमध्ये व्यायामशाळा बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी ७ लाख रुपये प्रमाणे ७० लाख, ५ गावांमध्ये बंदिस्त जीमसाठी प्रत्येकी ५ लाख प्रमाणे २५ लाख तर ६ गावांमध्ये ओपन जीमसाठी प्रत्येकी ५ लाख रुपये प्रमाणे ३० लाख असा सर्व मिळून १ कोटी २५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.निविदा प्रक्रिया राबवून लवकरच व्यायाम शाळा बांधकाम सुरू होणार असून जीममध्येही लवकरच व्यायाम साहित्य बसविण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.ही कामे मंजूर झाल्याने संबंधित गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
या गावांत व्यायाम शाळा…
आशापुरी घोटेवाडी, कुंदेवाडी,कोमलवाडी, दहिवाडी(महाजनपूर),दुशिंगपूर, देवपूर,निमगाव देवपूर,पांगरी खुर्द,पिंपळे व वारेगाव या गावांत ग्रामपंचायतच्या जागेत प्रत्येकी ७ लाख रुपयांतुन व्यायामशाळा बांधकाम होणार आहे.
या ठिकाणी होणार बंदिस्त व खुल्या जीम..
बंदिस्त व खुल्या जिमसाठी ११ गावांत प्रत्येकी ५ लाख रुपयांतून साहित्य बसविण्यात येणार आहे.पाटपिंप्री,श्रीरामपूर, मिठसागरे, पंचाळे, धारणगाव या गावांत बंदिस्त जिम तर मुसळगाव,सांगवी,श्रीरामपूर, वावी,रामपूर, पंचाळे येथे खुले जिम साहित्य बसविण्यात येणार आहे.पंचाळे येथे दोन्ही प्रकारची जीम मंजूर झाली आहे.
तरुणांना बळ देण्याचा प्रयत्न..
आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागात तरुणांसाठी अभ्यासिका व व्यायामशाळांची कामे करण्यात येत आहे.ज्याद्वारे तरुण अभ्यासिकेत बसून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू शकतील व ज्या तरुणांना सैन्य अथवा पोलीस सेवेत जायची इच्छा आहे,ते तरुण व्यायामशाळा अथवा जीम मध्ये जाऊन व्यायाम करतील.तरुणांना विधायक बळ देण्याचे काम विकास कामांतून सुरू आहे.
सीमंतिनी कोकाटे, जिल्हा परिषद सदस्या