सिन्नर – सिन्नर विधानसभा मतदारसंघात २० गावांत आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून ३० लाख रुपयांचे क्रीडा साहित्य मंजूर झाले आहे. ग्रामीण भागातील युवक व विद्यार्थी टीव्ही-मोबाईलपासून दूर करून तो मैदानावर खेळण्यास आणण्यासाठी यामुळे सोपे होणार आहे. अनेक गावांमध्ये खेळण्यासाठी मैदान आहे.क्रीडासाहित्य ठेवण्यासाठी आवश्यक असलेले भांडारगृह आहेत मात्र क्रीडासाहित्यच नाही.त्यामुळे गावातील युवक व विद्यार्थी वर्गणी काढून साहित्य घेतात,तेही पुरेसे नाही.यावर उपाय म्हणून सिन्नर विधानसभा मतदारसंघातील १८ ग्रामपंचायत व २ मॉडेल स्कुल दर्जा प्राप्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना क्रीडा साहित्य उपलब्ध व्हावेत म्हणून संबंधित ग्रामपंचायती व शाळांनी जिल्हाक्रीडाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केले होते.संबंधित प्रस्तावांना मंजुरी मिळण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी जिल्हाक्रीडा अधिकाऱ्यांना शिफारस केली होती.त्यानुसार २० प्रस्तावांना प्रत्येकी दीड लाख असा एकूण ३० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.यातून क्रिकेट,व्हॉलीबॉल, टेनिस,बॅडमिंटन,हॉकी,लगोरीसह विविध खेळाचे साहित्य उपलब्ध होण्याबरोबरच ते खेळ खेळण्यासाठी मैदानावर आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधाही त्यातून उपलब्ध होणार आहे. शिवाय योगासाठी मॅटही मिळणार आहे.
या ग्रामपंचायतींना मिळणार साहित्य…
आशापुरी(घोटेवाडी),खडांगळी,देवपूर, नायगाव,निमगाव देवपूर, पाथरे खु, पाथरे बु,वारेगाव,बार्शीनगर(बारशिंगवे),बेळगाव तऱ्हाळे,भरतपूर, भंडारदरावाडी,रामपूर, वारेगाव,शिवडे, सांगवी,सुंदरपूर(सुळेवाडी), सोनांबे व वडगाव पिंगळा या ग्रामपंचायतींना तर जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल दर्जा मिळालेल्या वडांगळी व माळेगाव येथील प्राथमिक शाळांनाही साहित्य मंजूर झाले आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी खेळण्यास पुरेसे क्रीडासाहित्य नाही.त्यामुळे युवक व विद्यार्थी मैदानावर येत नाही.खेळातून आरोग्य जपले जाते.त्यामुळे ग्रामपंचायतींनी व शाळांनी दाखल केलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यासाठी जिल्हाक्रीडा अधिकाऱ्यांना शिफारस केली होती.त्यातून २० प्रस्ताव मंजूर झाले.
माणिकराव कोकाटे, आमदार
छोट्या ग्रामपंचायतींना मोठा आधार..
आर्थिक दृष्ट्या लहान असलेल्या छोट्या ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे स्रोत कमी असतात.त्यामुळे अशा ग्रामपंचायती ग्रामनिधीतून असे साहित्य घेऊ शकत नाही.आमदार कोकाटे यांच्यामुळे क्रीडा विभागाकडून साहित्य मंजूर झाल्याने ग्रामीण भागातील छोट्या गावांतील खेळाडूंना व ग्रामपंचायतींना मोठा आधार मिळाल्याचे घोटेवाडीच्या सरपंच पाथरेच्या सरपंच मंजुश्री घोटेकर व पाथरे बु च्या सरपंच सुजाता नरोडे यांनी सांगितले.