सिन्नर – सिन्नर घोटी राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या वेळी घाटाजवळ कारला लागलेल्या आगीत एकाच मृत्यू झाल्याची घटना घडली. पहाटे ४.१५ दरम्यान बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला. या घटनेत कारचा चालक होरपळून मृत्यु झाला. विठ्ठल कृष्णा कोकाटे (२४) रा. अहमदनगर, ह. मु. पनवेल यांची ट्रॅव्हल्सची कार क्र. एम. एच. ४६ बी. बी. ६२६१ असून ते मुंबईहून भाडे घेऊन शिर्डी येथे आले होते. शिर्डीला भाडे सोडवून ते मंगळवारी (दि. १५) रात्री मुंबईला निघाले होते. पहाटेच्या सुमारास घोरवड घाटात आले असता कारमधील गॅसच्या टाकीने अचानक पेट घेतला. बघता-बघता पुर्ण कारने पेट घेतल्याने चारही दरवाजे आतून लॉक झाल्याने त्यांना कारबाहेर पडता आले नाही. रात्रीच्या वेळी महामार्गावर मदतीसाठीही कुणी नसल्याने ते कारमध्येच अडकून पडले. आगीत त्यांचा मोठ्या प्रमाणावर भाजल्याने कारमध्येच त्यांचा मृतदेह जळून खाक झाला. कारही पुर्णपणे जळून खाक झाली. बराच वेळानंतर महामार्गाने जाणाऱ्या काही वाहनधारकांनी सिन्नर पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिल्यानंतर एएसआय गणेश परदेशी व पोलिस नाईक नवनाथ शिरोळे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. जळालेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नगरपरिदेच्या रुग्णालयात पाठवण्यात आला.
सीएनजी किट असलेली कार
घाटाजवळ कारला लागलेल्या आगीत चालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास घडली. सीएनजी किट असलेली कार चहूबाजूंनी पेटल्याने चालकाला जीव वाचवण्याची कुठलीच संधी मिळाली नाही. आग विझवल्यावर कारच्या सापळ्यात चालकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली
बँकेसमोरून दुचाकी चोरीला
देवळाली व्यापारी बँकेसमोरून दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. भगवान निवृत्ती बलक (45) रा. वडगाव हे दुपारी कामानिमित्त शहरात आले असता त्यांनी आपली स्पेनडर नावाची दुचाकी क्र. एम. एच. 15/ सि. एफ. 8325 देवळाली व्यापारी बँकेच्या समोर पार्क केली होती. काम आटपून ते पुन्हा दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी जागेवर आढळली नाही. त्यांनी आसपास शोध घेऊन दुचाकी न सापडल्याने त्यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात येत चोरीची फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करत आहेत
गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
सिन्नर – तालुक्यातील पुतळेवाडी येथील 19 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मयूर गोरक्ष कोकणे असे मृत तरुणाचे नाव आहे. पुतळेवाडी येथील आपल्या राहत्या पत्राच्या घरात मयूरने फेट्याच्या सहाय्याने रात्रीच्या वेळी गळफास घेतला. सकाळी घरच्यांना हे कळताच त्यांनी त्यास खाली घेत दोडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टर यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी कामगार पोलीस पाटील संदीप धारणकर यांनी वावी पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक मैंद करत आहेत.
विवाहितेची आत्महत्या
सिन्नर – शहरातील वृंदावन नगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (दि. 16) सकाळी 8.30 सुमारास उघडकीस आली. वृंदावन नगर येथे भाडेतत्त्वावर राहणाऱ्या सुरेखा रेवणनाथ देशमुख (32) यांनी पती रात्रीच्यावेळी कामावर गेल्यानंतर घरातील छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी त्यांची 3 वर्षाची मुलगी व 7 वर्षाचा मुलगा हे झोपेतून उठल्यानंतर आईने गळफास घेतल्याचे बघताच त्यांनी वडिलांना फोनवर माहिती दिली. ते घरी आल्यानंतर त्यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात याबाबत कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करत मृतदेह नगर परिषदेच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. अधिक तपास पोलीस करत आहेत.
हरभऱ्याच्या शेताला आग लावून नुकसान
सिन्नर – तालुक्यातील मनेगाव येथील दोन शेतकऱ्यांच्या हरभऱ्याच्या शेतास आग लावून नुकसान केल्याची घटना घडली. मनेगाव येथील सेवानिवृत्त माजी सैनिक मधुकर सीताराम सोनवणे(65) यांनी शेत गट न. 294 व राजेंद्र गायकवाड यांनी आपल्या 348 मध्ये हरभऱ्याचे पीक घेतले होते. रात्रीच्या वेळी अज्ञात इसमाने दोघांच्या शेताला आग लावून पोबारा केला. यामुळे दोघांचे 32 हजारांच्या 800 किलो हरभऱ्याचे नुकसान झाले. सकाळी सोनवणे यांच्या हे निदर्शनास येताच त्यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात येत अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षण सारुकते करत आहेत.