सिन्नर : येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकताच मविप्र समाजाचे संचालक हेमंत नाना वाजे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या विस्तारित विस्तारित इमारतीच्या बांधकाम भूमिपूजनाचा समारंभ पार पडला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.व्ही.रसाळ, उपप्राचार्य डॉ.डी.एम.जाधव, प्रा.आर.व्ही.पवार, प्रा.व्ही.एस.सोनवणे, कॉन्ट्रॅक्टर श्री संजय गायकवाड व महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना मविप्र संचालक हेमंत नाना वाजे म्हणाले की, विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी संस्था नेहमीच तत्पर असते. याचाच एक भाग म्हणून जवळजवळ सव्वा दोन कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेच्या निविदा मंजूर करून संस्थेने सिन्नर महाविद्यालयासाठी या विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी परवानगी दिली आहे. भविष्यकाळाच्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात अशा सुविधा उभ्या करण्याला आपले नेहमीच प्राधान्य असते. महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यादृष्टीने संस्था नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सध्याची विद्यार्थी संख्या पाहतात महाविद्यालयाला आणखी विस्तारित इमारतीची आवश्यकता आहे. त्यामुळेच संस्थेने विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून तयार केलेल्या आराखड्यानुसार बांधकामास परवानगी आणि निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरात लवकर ही इमारत पूर्ण होऊन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.व्ही.रसाळ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, मविप्र समाज संस्था ही शिक्षणाची ध्यास घेतलेले संस्था आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या गरजा ओळखून संस्था नेहमीच प्रयत्नशील राहते. दिवसेंदिवस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे आणि त्यामुळे विस्तारित इमारतीच्या आवश्यकता होती. ही गरज ओळखून संस्थेने आपल्याला ही विस्तारीत इमारत देऊ केली आहे. या कार्याबद्दल त्यांनी संस्थाचालकांचे आभार मानले. याप्रसंगी मविप्र संचालक हेमंत नाना वाजे, कॉन्ट्रॅक्टर श्री संजय गायकवाड, उपप्राचार्य डॉ.डी.एम.जाधव, प्रा.व्ही.एस.सोनवणे, प्रा.श्रीमती पवार यांच्या हस्ते नारळ वाढवून सदर इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वाय.एल.भारस्कर यांनी केले, तर आभार उपप्राचार्य प्रा.आर.व्ही.पवार यांनी मानले.