सिन्नर – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुरुवारी युवा मित्र, बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी व एच.टी. पारेख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवा मित्र मुख्य कार्यालय परिसरामध्ये महिला मेळावा कार्यक्रम २०२२ आयोजित करण्यात आला. या महिला मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून लीना बनसोड (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक), डॉ. शरद गडाख (संशोधक संचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी), डॉ. संजय मंडकमहाले (प्रमुख प्रमुख शास्रज्ञ शेळीसंवर्धन विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी), डॉ. संजय महाजन (असिस्टंट कमिशनर पशुसंवर्धन विभाग, नाशिक), अण्णासाहेब गागरे (तालुका कृषी अधिकारी सिन्नर), मधुकर मुरकुटे गटविकास अधिकारी सिन्नर, डॉ. अजय थोरात (पशुधन विकास अधिकारी सिन्नर), डॉ. एन.के गुंजाळ विस्तार अधिकारी, डॉ. संजय जोशी (सीईओ कृषक मित्र सिन्नर), रंजित पुजारी (रंभा चारिटेबल ट्रस्ट), राजेश पाटील (बॅंक ऑफ महाराष्ट्र), अजित सूरसे (लिड बँक मॅनेजर, बॅंक ऑफ महाराष्ट्र) तसेच नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील शेळीपालन करणाऱ्या लाभार्थी महिला आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा मित्रच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांनी करून युवा मित्रचा आतापर्यंतचा प्रवास व महिला उपजीविका विकास कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या शेळीपालन या उपक्रमांविषयी माहिती देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. शेळीपालन व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे आणि सावित्रीबाई फुले शेळीपालन उत्पादक कंपनी यांच्याद्वारे शेळीच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या उपपदार्थाचे “सावी” या नावाने अनावरण करण्यात आले.
युवा मित्र मार्फत सुरू असणाऱ्या महिला उपजीविका विकास कार्यक्रम ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपजीविकेच्या माध्यमातून प्रभावी ठरत आहे. शेळीपालनाद्वारे महिला आपल्या कुटुंब व समाजासाठी किती उत्कृष्ट कार्य करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. यामार्फत युवा मित्रने शेळीपालन विक्रीव्यवस्था व प्रक्रिया उद्योगात मुल्यसाखळी विकसित केली याचे विशेष कौतुक हे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी बोलताना केले. तसेच त्यांनी शेळीपालकाना मनरेगाच्या माध्यमातून लाभ मिळून देण्याबाबत माहिती दिली. शेळी ही गरीबाची गाय आहे असे म्हटले जाते. शेळी पालनाद्वारे क्रांती घडविण्याचे काम युवा मित्रच्या माध्यमातून होत आहे. महिलांना शेळीपालन व्यवसायातून सक्षम बनविण्याचे काम संस्था करत आहे असे प्रतिपादन डॉ. शंकर गडाख (संशोधक संचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी) यांनी केले. हा कार्यक्रम पुढे घेऊन जाण्यासाठी विद्यापीठाकडून आवश्यक ती मदत व तांत्रिक मार्गदर्शन केले जाईल असे त्यांनी आश्वासित केले.
या महिला मेळाव्यामध्ये शेळीपालन करणाऱ्या महिलांना प्रोत्साहनपर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट शेळी, उकृष्ट गोठा, उकृष्ट करडू, आणि सर्वोत्कृष्ट पशुसखी या गटामध्ये उकृष्ट पशुपालकांचा सन्मान करण्यात आला. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील उकृष्ट पशुसाखी म्हणून हिराबाई आव्हाड, शांताबाई पानसरे, आशाबाई हळदे, यांना उकृष्ट शेळी या गटात बक्षिस देवून गौरव करण्यात आला. तसेच उकृष्ट करडे या विभागात विजया मडोळे, यमुना कातकाडे, मंगल सानप यांना बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट गोठा या गटामध्ये हिराबाई रेवगडे, शीला सांगळे, जयश्री डावरे यांना बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले. त्यासोबत उकृष्ट पैदासीचा बोकड या गटामध्ये गयाबाई शिरोळे, उर्मिला गवारे, पर्वता भांगरे आदि. सन्मानित करण्यात आले. तसेच सर्वोत्कृष्ट गोठा, शेळी व करडे या विभागामध्ये अंजना गांगड यांना बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले तसेच सर्वोत्कृष्ट पशुसखी म्हणून वैशाली लाड, सुनंदा गवळी व मनीषा रानडे यांना बक्षिसे देवून सन्मानित करण्यात आले. या महिला मेळाव्याच्या निमित्ताने सिन्नर, संगमनेर व राहता या तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. युवा मित्र संस्थेच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांनी कार्यक्रमाचे प्रस्थाविक केले. युवा मित्रच्या सहायक संचालिका शितल डांगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.