सिन्नर – सिन्नर नगरपालिकेच्या सहकार्याने वनप्रस्त फाउंडेशन सिन्नर तालुक्यातील पहिली देवराई वीर सावरकर नगर, सरदवाडी उड्डाणपुलाजवळ, नाशिक पुणे बायपास, सिन्नर याठिकाणी साकारत आहे. नगरपालिकेच्या वतीने वनप्रस्थला मिळालेल्या सुमारे ४४ गुंठ्याच्या ओपन स्पेस मध्ये वनप्रस्थफाउंडेशनच्या वतीने देवराई ऑक्सिजन पार्क होत आहे. वनप्रस्थचे स्वयंसेवक गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून रोज सकाळी दोन तासांच्या श्रमदानातून या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील दुसरी व सिन्नर तालुक्यातील पहिलीच देवराई तयार करण्यासाठी श्रमदान करीत आहे. वनप्रस्थचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या ठिकाणी देवराई पद्धतीने दुर्मिळ अशा ११९ प्रकारच्या देशी प्रजातीच्या ५०० रोपांची लागवड केली जाणार आहे तर घनवट पद्धतीने सुमारे सातशे रोपांची लागवड केली जाणार आहे. यासाठी पुणे येथील देवराई फाउंडेशन यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.
शनिवारी सकाळी ९.३० वाजता देवराई फाऊंडेशनचे अध्यक्ष रघुनाथ ढोले पाटील, सिन्नर तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे तसेच माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शितलताई सांगळे, जि. प. सदस्या सीमंतिनी कोकाटे, युवा नेते उदय सांगळे, मा. नगराध्यक्ष किरण डगळे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, माजी गटनेते हेमंत वाजे व नामदेव लोंढे तसेच प्रांताधिकारी व प्रशासक डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, मुख्याधिकारी संजय केदार, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, वनक्षेत्रपाल कु. मनीषा जाधव तसेच सिन्नर नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी वृंद हे उपस्थित राहणार आहेत. तरी सिन्नर शहरातील सर्व सामाजिक संस्था, जलमित्र, वृक्षमित्र यांनी या महावृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन वनप्रस्थ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
—