सिन्नर – १९८२ साली वडिलांनी सिन्नरमध्ये औद्योगिक वसाहत सुरू केली. माझी स्वतःची कंपनी आहे आणि ती सांभाळताना मी वसाहतीच कामही बघायला लागले. वडिलांच्या मार्गदर्शनाखालीच मी हे काम सुरू केलं, त्यांच्यासारखं मी हे काम करू शकणार नाही. पण पूर्ण प्रयत्नाने, जिद्दीने हे काम मी पुढे नेणार आहे, असे मत सिन्नर औद्योगिक वसाहतीच्या प्रशासकीय अध्यक्षा सुधाताई गडाख यांनी मांडले.
इंडिया दर्पण आयोजित महिला दिन विशेष फेसबुक लाइव्हमध्ये त्या बोलत होत्या. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. औद्योगिक वसाहतीची मुहूर्तमेढ कशी रोवली याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, १९८२ साली वसाहत स्थापन करणं हे तस अवघड होते. विडी कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेला सिन्नर हा तसा दुष्काळी भाग. सिन्नरच्या विकासासाठी उद्योग आणायला हवे हे वडिलांच्या लक्षात आले. त्यावेळी सरकारकडून काहीही मदत मिळाली नाही. मग आपणच सहकारी तत्वावर वसाहत उभी करावी हा विचार त्यांच्या मनात आला. त्यातूनच एक एक उद्योजकाला भेटणं, दिल्लीहून परवानगी मिळवणं हे सगळं काम त्यांनी केलं आणि सिन्नर औद्योगिक वसाहत सुरू झाली. त्यावेळी तू हे करू शकणार नाही, असा विरोधही झाला. पण वडिलांनी आपल्या तरुणांना रोजगार कसा मिळेल, सिन्नर मध्ये उद्योजक कसे येतील याचा विचार दूरदृष्टीने केला. आणि आज आपण सिन्नरच बदललेलं रुप सगळेच बघत आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रशासकीय अध्यक्षा म्हणून काम करतानाच्या त्यांच्या अनुभवविषयी त्यांनी सांगितले की, सामाजिक कार्याचा संस्कार वडिलांकडून मिळाल्यामुळे समाजासाठी काय करता येईल हा विचार कायम मनात असतो. एखादे काम आल्यावर त्याचा सातत्याने पाठपुरावा करून ते काम पूर्ण करण्याची माझी सवय आहे. प्रशासक आपल्या दारी हा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. त्या माध्यमातून कारखानदारांना जाऊन भेटणं, त्यांच्याशी बोलून समस्या, अडीअडचणी समजून घेणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कोणताही उद्योग सुरु करताना रस्ता, पाणी, वीज या मूलभूत गरजा पुरवणं हे महत्त्वाचे असते. सातत्याने मीटिंग घेऊन लोकांशी बोलून या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि हे सगळं सुरळीत सुरू आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने त्या म्हणाल्या की, महिलांनी स्वावलंबी झालं पाहिजे. महिलांसाठी त्या स्वामिनी ही संस्था चालवत आहेत. त्या माध्यमातून गृहिणींसाठी रोजगार उपलब्ध करून दिला जातो.सिन्नरच्या औद्योगिक वसाहतीत महिलांचा सहभागही मोठा आहे आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. या सगळ्या कार्यात कायम सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच कायम सहकार्य मिळते असंही त्यांनी आवर्जून सांगितले.