सिन्नर – शहरातील संस्कृती सुपर मार्केट परिसरात एकास पोलिस असल्याचे सांगून लुटल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. दादा बाबुराव शेळके (६२) रा. द्वारका नगर हे परिसरात फेरफेटका मारत असताना संस्कृती सूपर मार्केट परिसरात अज्ञात व्यक्तीने त्यांच्याजवळ येत पोलिस असल्याची बतावणी केली. तुमचे दागिने चेक करायचे असल्याचे सांगून त्याने शेळके यांना गळ्यातील ३९ हजारांची १३ ग्रॅम वजनाची चेन व १५ हजारांची ५ ग्रॅम वजनाची अंगठी त्याच्याकडे देण्यास सांगितले. शेळके यांनी पोलिस असल्याचे मानत चेन व अंगठी काढून त्यांच्या हातात दिली. दागिने हातात पडताच भामट्याने तेथून पोबारा केला. शेळके यांना लुटले गेल्याचे समजताच त्यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात येत अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीची तक्रार नोंदवली. अधिक तपास पोलिस करत आहेत.