सिन्नर – सिन्नर शहरातील प्रसिद्ध प्राचीन श्री गोंदेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता श्रींच्या मुखवट्याची नजर प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. या पालखीचे स्वागत सडा रांगोळी तसेच पंचारतीने करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी शृंगार पूजा, लाईट शो व महाप्रसाद वाटप करण्यात आले. श्री. गोंदेश्वर सेवा संघाने आयोजन केले होते. या संपूर्ण सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
गोंदेश्वर मंदिर’ हे मंदिर पुरातन (भूमिज स्थापत्यशैली) बांधकामाचा उत्तम नमुना आहे. याला हेमाडपंथी शैलीही म्हणतात. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. गोंदेश्वर मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. मार्च, १९०९साली भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. ‘सेउना’ म्हणजेच यादव घराण्यातील राजगोविंद हा राजा. ‘सेउनाचंद्र’ या राजाने वसविलेले ‘सेउनापुरा’ म्हणजेच सिन्नर. खिलजीच्या आक्रमणामुळे ह्या राजवटीची वाताहत झाली. काळ्या बेसाल्टमध्ये बांधलेले हे मंदिर अजूनही खुपसे सुस्थितीत आहे.
मुख्य शिवमंदिर आणि सभोवतीची चार उपदिशांना असणारी चार मंदिरं असल्यानं याला शैवपंचायतन म्हटलं जातं. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव पिंड आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. एक अप्रतिम ऐतिहासिक ठेवा, स्थापत्यकलेचा देखणा खजिना सिन्नर च्या गावाबाहेर वसलेला आहेत अनेक पर्यटक देश विदेशातून येत असतात तसेच सिन्नर आजूबाजूलाच मुक्तेश्वर मंदिर ,ऐश्वर्य मंदिर, नागेश्वर मंदीर, असे बारा प्रकारचे मंदीर आहेत.