सिन्नर – सिन्नर बायपास जंक्शन ( माळेगाव फाटा ते गुरेवाडी ) या दरम्यानच्या रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न कायमचाच निकाली काढण्याकामी खा. गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.खा. गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून माळेगाव फाटा ते गुरेवाडी या दरम्यानच्या महामार्गाचे मजबुतीकरण करण्यासाठी केंद्राच्या नॅशनल हायवे विभागाने १४ कोटी रूपयांच्या निधीला आज मान्यता दिली आहे.या रस्त्याच्या मजबुतीचा लाभ सिन्नर वासियांसह नाशिककडून शिर्डीकडे जाणा-या भाविकांना तसेच माळेगाव व मुसळगांव औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांना होणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे .
गेल्या काही महिन्यांपासून माळेगाव फाटा ते गुरेवाडी रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्यामुळे प्रवासी, वाहनधारक तसेच भाविकांची मोठी कुचंबना होत होती . सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे यासाठी माळेगाव, सिन्नर,नाशिक येथील नागरिकांनी खा. गोडसे यांना साकडे घातले होते. माळेगाव फाटा ते गुरेवाडी या रस्त्याविषयी नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची खा. गोडसे यांनी दखल घेत सदर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला होता.
याकामी खा.गोडसे यांनी अनेकदा दिल्लीत जाऊन नॅशनल हायवे विभागाच्या अधिकाऱ्यांना माळेगाव फाटा से गुरेवाडी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे महत्त्व पटवून दिले होते. खा.गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने केंद्राने आज माळेगाव फाटा ते गुरेवाड़ी या दरम्यानच्या रस्त्याच्या मजबुती आणि डांबरीकरणासाठी चौदा कोटी रूपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. माळेगाव फाटा ते गुरेवाडी या रस्त्याची लांबी साडे आठ किलो मीटर इतकी आहे.येत्या काही महिन्यांतच माळेगाव फाटा ते गुरेवाड़ी या दरम्यानच्या रस्त्याचे मजबुती व डांबरीकरणाचे काम पूर्ण होणार असून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे.