सिन्नर – संपूर्ण नाशिक जिल्ह्यात व सिन्नर तालुक्यामध्ये कोरोना बाधित व्यक्तींचे प्रमाण झपाट्याने कमी होत असतांना सिन्नर तालुक्यातील नांदुरशिंगोटे, दोडी बु. या गावांमध्ये मात्र कोरोना बाधित व्यक्तींची संख्या वाढत आहे. ही बाब विचारात घेऊन महसुल, पोलीस, पंचायत समिती व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्त कार्यवाही व कारवाईस सुरुवात केली. शुक्रवारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसिलदार राहुल कोताडे, वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नायब तहसिलदार ललिता साबळे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन कार्यवाहीचे नियोजन करण्यात आले. तर कडक कारवाई करण्यास सुध्दा सुरवात करण्यात आली.
त्यानुसार नांदुरशिंगाटे येथे विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींची रॅपीड अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये पॉझिटीव्ह आढळलेल्या व्यक्तींना इंडिया बुल वसतीगृह येथील सीसीसी सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. गृह विलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तींची घरी जाऊन पाहणी करण्यात आली. गृह विलगीकरणाचे नियम न पाळणाऱ्या व्यक्तींना इंडिया बुल येथील सीसीसी सेंटरमध्ये दाखल करण्याच्या सुचना देण्यात आल्या. नांदुरशिंगोटे येथे एकुण 157 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून बाधित आढळून आलेल्या ४ व्यक्तींना सीसीसी सेंटर मध्ये दाखल करण्यात आलेले आहे. कोरोना चाचणीसाठी डॉ. नितीन म्हस्के व डॉ. राहुल हेंबाडे यांच्या पथकाने कार्यवाही केली. प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाहीमध्ये 3 पेट्रोल पंपावरही कारवाई करण्यात आली असून एकुण ३० हजार रुपये दंड वसुल करण्यात आलेला आहे.
दोडी बु. येथे केलेल्या तपासणीमध्ये सर्व आस्थापना चालकांनी कोरोना चाचणी निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक असल्याचे व असे प्रमाणपत्र नसल्यास संबंधित आस्थापना बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या. या परीसरात कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आरसीएफच्या २५ जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामार्फत कोरोना नियमांचे पालन न करणारे व विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोना बाधित व्यक्तींची वाढती संख्या, मृत्युचे प्रमाण, तसेच लहान मुलांमध्ये वाढत असलेला संसर्ग विचारात घेता सर्व नागरीकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापना व व्यक्ती यांचेवरही कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे