सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेततळ्यात बुडून खंबाळे येथे २४ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला आहे. सोनल भाऊसाहेब आंधळे असे मृत युवतीचे नाव आहे. ही दुर्देवी घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली आहे.
वावी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनल ही तिच्या वडिलांसह शेतात असलेल्या शेततळ्याजवळ गेली होती. तळ्यात किती पाणी आहे हे दोघांनी बघितले. तुम्ही घरी जा मी येथे थोडा वेळ थांबते असे सोनलने तिच्या वडिलांना सांगितले. त्यानंतर तिचे वडिल घरी गेले. मात्र, अर्धा तास झाला तरी सोनल घरी परतली नाही म्हणून तिचे वडिल पुन्हा शेततळ्याजवळ आले. सोनल शेततळ्यात पडलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी जोरजोरात आरडाओरडा केला. त्याची दखल घेत परिसरातील शेतकरी येथे आले. सर्वांनी सोनलला पाण्याबाहेर काढले. तिला तातडीने दोडी येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी वावी पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. भाऊसाहेब किसन आंधळे हे शेतकरी आहेत. ते आपल्या कुटुंबासह शेतात राहतात. सोनलच्या पश्चात आई, वडिल आणि भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.