सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चिंचेच्या झाडाला झोडपून त्यावरील पक्षांच्या शेकडो पिल्लांचा जीव घेण्याचा अजब प्रकार शहरात घडला आहे. आज (दि.31) गणेशाच्या आगमनाच्यावेळी एका हॉटेलच्या प्रांगणात ही बाब घडली असून त्याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नुकतेच जन्मलेल्या व मरणासन्न अवस्थेतील पिल्लांच्या विव्हळण्यामुळे त्यांनाही हुंदका अनावर झाला.
शहरातील पंचवटी हॉटेलच्या प्रांगणात एक जुने चिंचेचे झाड असून हॉटेलच्या प्रवेशद्वारासमोरील हे झाड आत्तापर्यंत हॉटेलची शान मानले जात होते. या झाडाखाली अनेक सोहळेही पार पडले आहेत. या वृक्षावर शेकडो बगळे, पानकावळ्यांसह अनेक पक्षी वर्षानुवर्ष आपला मुक्काम ठोकून आहेत. या दाट वाढलेल्या झाडात या पक्षांची शेकडो खोपी, घरटीही बघायला मिळतात. हॉटेलात येणारे काही ग्राहक याच वृक्षाच्या छायेखाली आपली आलीशान चारचाकी वाहनेही उभी करतात. या वाहनांवर पक्षांच्या विष्ठेसह अन्य घाणही पडत असल्याने वाहन खराब होत असल्याची तक्रार काही ग्राहकांनी हॉटेलच्या व्यवस्थापनाकडे केली.
हॉटेल व्यवस्थापनाने त्यावर अघोरी उपाय शोधल्याची सर्वत्र चर्चा आहे. सकाळी ११ च्या दरम्यान हॉटेलमधील तीन-चार सेवकांनी थेट काठ्या हातात घेऊन चिंच झोडपायला सुरुवात केली. त्यात चिंचा पडण्याबरोबरच पक्ष्यांचे खोपेही पडू लागले. काही खोप्यातील अंडे पडून फुटल्यानंतर त्यातील छोटा जीव मृत्यूशी झुंज देताना दिसू लागला, तर काही खोप्यांमधील पक्षांची पिल्ले रक्तभंबाळ अवस्थेतही खाली पडल्याचे हृदयद्रावक चित्र काही ग्राहकांनी पाहिले. अखेर काहींनी चिंच झोडपणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. पक्ष्यांना, त्यांच्या खोप्यांना इजा पोहोचणार नाही अशा पद्धतीने चिंचा हव्या तर तोडा असा सल्लाही काही ग्राहकांनी दिला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत या सेवकांनी झाडावर बेदरकारपणे काठ्या मारणे सुरु ठेवल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
झाडावर रोग पडला असून झोडल्याशिवाय तो रोग दूर पळणार नाही, असेही झोडणाऱ्या एका सेवकाने ग्राहकाला सांगितल्याचे समजते. अवघ्या काही मिनिटात झाडाच्या खाली पक्षांच्या पिल्लांचा, खोप्यांचा सडाच पडलेला दिसू लागला. त्यातील अनेक छोटी पिल्ले जागेवरच गतप्राण झाली होती. काही ठिकाणी पिल्लांचा खच पडला होता. अचानक आलेल्या संकटामुळे अनेक पक्षी आपल्या पिल्लांचे झालेले हाल पाहून झाडाभोवती घिरट्या घालत आक्रोश करीत असल्याचेही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. यावेळी उपस्थित असलेल्या काही ग्राहकांनी थेट नाशिकच्या पक्षी मित्रांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला व पक्षांवर अचानक झालेल्या संकटाची माहिती त्यांना दिली. काहींनी थेट वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. सुमारे अर्धा पाऊण तासाने वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यात सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी बोकाटे, वनरक्षक वत्सला कांगणे, तुकाराम डावरे, किरण गोर्डे यांचा समावेश होता.
पक्षांच्या पिल्लांचा खच पाहून तेही अवाक झाले. जिकडे नजर फिरवली तिकडे तुटलेली घरटी, रक्तभंबाळ पिल्ले दिसत होती. मोजता येणार नाही एवढ्या संख्येने ही पिल्ले पाहून त्यांचीही मने द्रवल्याचे समजते. काही पिल्ले विव्हळत असली तरी जगण्याची शक्यता नव्हती. तरीही या पथकातील सेवकांनी एक-एक करीत पिल्ले जमा करण्यास सुरुवात केली. हॉटेलातील सेवकांनी आधीच काही ठिकाणी पिल्ले गोळा करुन त्यांचा खच करुन ठेवला होता. वनविभागाच्या पथकातील काही सेवकांनी पंचनामाही केला. त्यातील काहींनी हॉटेलमधील सेवकांचे जबाबही घेतले. पक्ष्यांची घाण वाहनांवर पडत असल्याने झाड झोडपून खोपे पाडत असल्याचा एका सेवकाचा जबाब नोंदवूनही घेण्यात आला. मात्र, त्यानंतर सेवकाने आपला जबाब बदलल्याचे समजते. चिंचेवर चिंचा जास्त झाल्याने झोडपून चिंचा पाडत होतोे. मात्र, जाणून बुजून पक्षांना मारले नसून अनावधाने ही घरटी पडल्याची कबुली त्याने दिली असल्याचे समजते. वन परिक्षेत्र अधिकारी मनिषा जाधव यांच्या उपस्थितीत कायदेशीर कारवाई करण्याचे काम दुपारनंतर सुरु झाल्याचे समजते.
अशा प्रकारे पक्षांचा अधिवास नष्ट करण्याचा अधिकार कुणालाही नाही. शेकडो पक्षांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुध्द कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा सुरु आहे. जुन्या वृक्षांच्या फांद्याही कुणाला तोडायच्या असल्यास त्यांनी वनविभागाला आधी कळवायला हवे. वनविभाग वृक्षांची पाहणी करुन त्यावरल पक्षांना स्थलातंरीत अथवा दुसऱ्या अधिवासात पाठवण्याची व्यवस्था करु शकतात. त्यातून पक्षांचे जीव वाचवता येतील, असे मानद वन्य जीवरक्षक वैभव भोगले यांनी सांगितले आहे.
वनविभागाने सांगितले की, आज दिनांक 31/08/2022 रोजी इम्रान शबीर सय्यद (वय 32 रा.सिन्नर), सर्वर शकील शेख (वय 38 रा. सिन्नर), सादिक शकील शेख (वय 30 रा. सिन्नर) यांनी सिन्नरच्या हॉटेल पंचवटी मोटेल्स परिसरातील झाडाचे वाळलेले चिंच झोडण्याचे काम करीत होते. त्याचवेळी १०२ पाणकावळे, १३ ढोकरी (Pond Heron) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ कायद्या अंतर्गत प्रथम गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील चौकशी सुरू आहे. सदर प्रकरणात एकूण २२ पक्षी यांचे रेस्क्यू करून त्यांच्यावर वन विभागाच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
Sinner Hundreds of Birds Die in Hotel Premises
Crime