कोपरगावच्या कारागीर पुत्राची यशोगाथा: ज्ञानेश्वर पगारे
– विकास गीते, सिन्नर
जीवनात इच्छाशक्ती असेल तर प्रगती कशी होऊ शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर पगारे. पोहेगाव तालुका कोपरगाव येथे शेती अवजारे बनविणाऱ्या कारागीराच्या घरात ज्ञानेश्वर याचा जन्म झाला. गावातच श्रीमंत जमीनदाराच्या घरात घरकाम करून त्याने शिक्षण घेतले. जेमतेम दहावी पर्यंतचे शिक्षण त्याने पोहेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. ग. र. औताडे पाटील विद्यालयात घेतले. गावातील प्रतिष्ठीत मान्यवर मा . कै . माधवराव शिंदे यांनी त्याला के जे सोमैय्या कॉलेज कोपरगाव येथे शिपायाची नोकरी दिली. दिवसभर आपले शिपायाचे कामकाज प्रामाणिकपणे करून सायंकाळी एक तास व्हॉलीबॉल खेळणे हा त्याचा छंद होता. यानंतर सायंकाळी आठ ते पहाटे तीन वाजेपर्यंत शिर्डी येथे स्वत:ची छोटीशी पानटपरी चालवणे हा छंद १९९० पासून जोपासला. पुढे एम. फील. पर्यंत शिक्षण घेतले. २०१७ पासून पुण्यात अलका टॉकीज कुमठेकर रोडवर एका छोट्याशा गाळ्यात छोटीसे पान स्टॉल सुरू केले.
जिद्द, मेहनत, चिकाटी आणि क्वालिटी यांच्या जोरावरती तब्बल ८९१ प्रकारच्या पानांच्या व्हरायटीज तयार करून स्वतःचा माऊली फॅमिली पान स्टॉल नावाचा ब्रॅन्ड तयार केला. यात १६ आयुर्वेदिक पावडर आणि १४ संपूर्ण आयुर्वेदिक मसाले असून पानाची किंमत ५० रुपया पासून ते दीड लाखापर्यंत आहे. पुण्यासह संपूर्ण देशात व देशाबाहेरही या पानांना प्रचंड मागणी आहे. पानांची वैशिष्ट्ये म्हणजे पान खाण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने महिलाही खास या आयुर्वेदिक पानांची मागणी करतात. या पानात ३४ ते ८० मसाले वापरले जातात. आयुर्वेदिक कात, फिल्टर केलेला चुना यात टाकलेला फ्लेवर हा कृत्रिम नसून तो स्वतः घरात तयार केला जातो. फळांचा फ्लेवर देखील यात आहे. चॉकलेट पान, मगई पान, फायर पान याची मागणी देश-विदेशात जास्त आहे. पुण्यात सात शाखांसह प्रत्येक जिल्ह्यात माऊली फॅमिली पान हाऊस म्हणून आता नावारुपाला आला आहे.
प्रशांत दामले सारखे सिनेकलाकार आजही या पानाची मागणी करतात. या स्टॉलवर गुटखा, तंबाकु, बीडी, सिगारेट हे पदार्थ मिळत नाहीत. आयुर्वेदिक पान पचनासाठी आवश्यक आहे. अचानकपणे या मित्राच्या माऊली फॅमिली पान स्टॉलला भेट दिल्यानंतर त्यांनी केलेली प्रगती व एक चांगला उद्योजक म्हणून केलेला नावलौकिक हा निश्चितच आम्हाला भावला. ज्ञानेश्वरच्या वाटचालीत पत्नी शैला पगारे, मुलगा भारत व गौरव पगारे यांचाही वाटा मोठा आहे. असा हा शिपाई ते उद्योजक पर्यंत पोहचलेला कर्तृत्ववान माणूस.