सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साडेबारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या संशयिताने सिन्नर पोलीस ठाण्याच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जितेंद्र गुलामजी तोरोले (२८) रा. खडकीवन, जि. बडवाणी (मध्य प्रदेश) असे संशयिताचे नाव आहे. या तरुणास जखमी अवस्थेत नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.
या संशयित तरुणास सिन्नर पोलीस ठाण्यात बोलावले होते. पाणी पिण्याच्या बाहण्याने तो चौकशी कक्षा बाहेर आला आणि त्याने थेट पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने उचलून उपचारासाठी सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या युवकावर अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पोस्को कायद्याअंतर्गत आणि पहिल्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लहामगे अधिक तपास करीत आहेत.