सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर सिन्नरकर असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, पुढील २ ते ३ दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सिन्नर नगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सिन्नर शहरास कडवा योजनेची 600 mm व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या जलवाहिनीला बोरखिंड गावाजवळ आज (11 फेब्रुवारी) सायंकाळी मोठी गळती सुरू झाली आहे. ही गळती थांबविण्याचे काम आता हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण होण्यास मोठा कालावधी लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सिन्नर शहरास होणारा पाणीपुरवठा निर्धारित वेळेपेक्षा 2 ते 3 दिवस उशिराने होणार आहे. या बाबतीत पाणी पुरवठा विभागातर्फे तात्काळ गळती दूर करण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना उपलब्ध पाण्याचा संचय करून ते जपून वापरावे, असे आवाहन सिन्नर नगरपालिकेने केले आहे.