सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील मऱ्हळ गावातील प्रदीप आढाव यांच्या शेतात ऊसतोडणी कामगारांना शेतामध्ये बिबट्याची दोन नवजात बछडे आढळून आली. ऊसतोडणीचे काम थांबवत त्यांनी त्वरित घटनेची माहिती वनविभागास दिली. या बछड्यांना त्यांच्या मातेकडे स्वाधीन करण्यासाठी वन विभागाच्या पथकाने नियोजन केले. मात्र मादी बिबट्याने केवळ एकच बछडे नेले. तर दुसऱ्या बछड्याला मात्र आईच्या कुशीत जाण्यासाठी अक्षरशः ३० तास प्रतीक्षा करावी लागली. दिवसभर वन विभागाने या बछड्याची सुरक्षित हाताळणी करत त्याची काळजी घेतली. अखेर ३० तासांनंतर बछडे मादी घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.