सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-पुणे महामार्गावर नांदूर शिंगोटे बायपास जवळ सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील लष्करी जवान जितेंद्र संपत आंधळे (वय २८) यांचे अपघाती निधन झाले. समोरून येणाऱ्या गाडीच्या हेडलाइटच्या प्रकाशामुळे दुचाकीचे नियंत्रण सुटले व दुचाकी दुभाजकाला धडकली. यात जवान जितेंद्र आंधळे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेले ज्ञानेश्वर उत्तम सांगळे हे जखमी झाले आहे.
गुरुवारी रात्री ते पत्नी व मुलांना घेऊन मानोरी येथे सासरवाडीला गेले होते. त्यांना तिथे सोडून त्यांचे साडू ज्ञानेश्वर सांगळे यांच्यासोबत नातेवाईकांना भेटण्यासाठी नांदूर शिंगोटे येथे गेले होते. तेथून परतत असताना नांदुर-शिंगोटे बायपास जवळ हा अपघात झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी ज्योती, सात वर्षीय मुलगा पियुष, तीन वर्षीय मुलगी आरोही असा परिवार आहे.
जवान जितेंद्र आंधळे हे २३ मराठा बटालियन मध्ये केरळ येथे कार्यरत होते. त्यांची कर्नाटक येथे बदली झाल्याने पत्नी व मुलांना गावी ठेवून ते नवीन नियुक्ती झालेल्या ठिकाणी कर्तव्यावर हजर होणार होते. पण, त्याअगोदरच ही दुर्दैवी घटना घडली. या अपघाताची माहिती समजतात वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, उपनिरीक्षक आर टी तांदळकर यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान आंधळे यांच्या अपघाती मृत्यूची बातमी लष्करी अधिकाऱ्यांना दिली असून शववि्छेदनानंतर दुपारी एक वाजे दरम्यान खंबाळे येथे शासकीय इतमामात आंधळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Sinner Army Jawan Road Accident Death