सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गॅस टँकरने धडक दिल्याने दहावीच्या परिक्षेला जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. सिन्नर-घोटी महामार्गावर तालुक्यातील आगासखिंड शिवारात ही घटना घडली. दर्शन शांताराम आरोटे (१४) व शुभम रामनाथ बरकले (१४) रा. असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. हे दोघेही आगासखिंड येथील असून ते माध्यमिक विद्यालयात शिकत होते. सकाळी ९.३० वाजता ही घटना घडली.
आजपासून दहावीच्या परिक्षेला सुरुवात झाली. आज मराठीचा पहिला पेपर असतांना हे दोघे सकाळी ९ वाजता पांढुर्ली येथील परिक्षा केंद्राकडे स्कुटीवरुन परिक्षेला जात होते. पण, या प्रवासात त्यांच्या स्कुटीला एचपीच्या गॅसच्या टँकरने धडक दिली. या धडकेमुळे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सिन्नर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत टँकर व चालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे आगसखिंड, पांढुर्लीसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मंदिरात घेतले दर्शन
आगासखिंड गावाजवळ महामार्गालगत असलेल्या डी. एड. महाविद्यालयाच्या गेटवर श्री स्वामी समर्थांचे मंदिर आहे. येथे परिक्षेला जाण्याआधी दर्शन व शुभमने तेथे थांबले. त्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन या दर्शन घेतले. त्यानंतर ते परिक्षा केंद्राकडे जात असतांना हा अपघात झाला.