विलास पाटील
सिन्नर– घरची परिस्थिती हलाखीची असतानाही प्रचंड मेहनत घेत, जिद्दीने, आपल्या हुशारीच्या जोरावर अकाउंटच्या क्षेत्रात उतरत देशभर भरारी घेणाऱ्या नंदकुमार नि-हाळी यांचा शून्यातून उभा राहिलेला व्यवसाय सर्वांनाच थक्क करणारा आहे. आज स्वतःच्या प्रशस्त अशा नव्या कार्यालयात ते स्थलांतर करीत असून या क्षेत्रात येणाऱ्या नव्या युवकांना त्यांची यशोगाथा प्रेरणा देणारी ठरणार आहे.
गणेश पेठेतील किराणा दुकानांमध्ये हमाली करणारे वडील. रोज कष्ट करायचे, तेव्हा नंदकुमार यांच्या घरात चूल पेटायची. अशा काळात शिक्षण एवढाच या कुटुंबासाठी आशेचा किरण होता. नंदकुमार यांनी हे आधीच ओळखले होते. त्यामुळे बी. कॉम. होताच पुढे शिकण्यापेक्षा घरात आर्थिक मदत होईल आणि स्वतःलाही शिकता येईल या भावनेतून त्यांनी नासिक गाठले. सनदी लेखापाल ओमप्रकाश जाजू नाशिकमध्ये स्थिरस्थावर झालेले. त्यांचा संपूर्ण जिल्ह्यात ग्राहकवर्ग पसरलेला होता. सिन्नर शहरातील कलंत्री कुटुंबाने शिफारस करणारी चिठ्ठी दिल्यानंतर जाजू यांनी नंदकुमार यांना आपल्या कार्यालयात शिकाऊ म्हणून नवी कारकीर्द सुरू करण्यास परवानगी दिली. दररोज सकाळी सिन्नरहून निघायचे. सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत कार्यालयात थांबून विविध व्यवसायाकांची इन्कम टॅक्स, सेल टॅक्स संबंधित कामे करायची. संध्याकाळी पुन्हा सिन्नरला परतायचे असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. या कामातून शिकतानाच या क्षेत्राशी संबंधित पदव्या मिळवायच्या असा त्यांनी चंग बांधला.
शिकत असाल तर नाशिकला येण्या-जाण्यासाठी त्या काळात एस. टी.चा विद्यार्थी पास सवलतीत मिळायचा आणि आर्थिक भार कमी व्हायचा. त्याचा लाभ घेत नंदकुमार यांनी जी.डी.सी. अँड ए., एल. एल. बी. या पदव्या मिळवल्या. सिन्नरला घरी परतल्यानंतर गावातील काही व्यापाऱ्यांचे हिशोब लिहिण्याचे काम त्यांनी सुरू केले. नाशिकचा अनुभव सात-आठ वर्षांच्या पुढे सरकताच गावातील कामे मिळण्याचा ओघ वाढला. त्यात मित्र परिवाराची मोठी मदत झाली. त्यानंतर सिन्नर शहरातील भिकुसा कॉम्प्लेक्समध्ये ३ जानेवारी २००० रोजी स्वतःचे कार्यालय नंदकुमार यांनी सुरू केले. त्यावेळी या क्षेत्रात गुजराथी, देशपांडे अशा नावांचा दबदबा होता. तरीही न डगमगता ते या क्षेत्रात पाय रोवून उभे राहिले. ग्राहकांचा विश्वास आपल्या कामातून मिळवला आणि आज त्यांच्या कार्यालयाची एकवीस वर्षे पूर्ण होऊन गेली असून त्यांच्याकडे देशभरातील पंधराशेहून अधिक ग्राहकांची कामे आली आहेत. देशातील आसाम, तेलंगणा, ओरिसा, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोव्यासह विविध राज्यांपर्यंत त्यांच्या व्यवसायाच्या सीमा वाढल्या आहेत. हैदराबाद, मुंबईतही महिन्यातील काही दिवस त्यांना आपल्या अशिलांकरीता राखीव ठेवावे लागतात. इन्कम टॅक्स, जी.एस.टी. च्या सर्वोच्च न्यायालयातील तारखानाही सध्याच्या कोविडच्या काळात ऑनलाइनच्या माध्यमातून उपस्थित राहत आपल्या अशिलांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा नयन याने जी.एस.टी. मध्ये पी.एच.डी. मिळवली असून असा बहुमान मिळवणारा महाराष्ट्रातील पहिला सनदी लेखापाल होण्याचा मान त्याने मिळवला आहे.
मोफत गृहकर्ज सेवा
गृहकर्ज घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना विनामोबदला सेवा देण्याचा उपक्रम नंदकुमार यांनी दहा वर्षापासून सुरू केला आहे. शहरासह तालुक्यातील राष्ट्रीयकृत बॅंकांच्या माध्यमातून शेकडो ग्राहकांना त्यांनी घरासाठी कर्ज मिळवून दिले आहे. ग्राहकाची कर्जाची फाईल तयार करून घेणे, त्यातील अपूर्ततांची पूर्तता करणे, बँकेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणे ही कामे कुठलाही मोबदला न घेता ते मोफत करत ग्राहकांच्या घराच्या स्वप्नपूर्तीत महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. गृहकर्ज मिळाल्यानंतर ग्राहकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हीच आपली फी असल्याचे ते म्हणतात.
समाज सेवेतही आनंद
लायन्स क्लब ऑफ युनिटी सिन्नरचे अध्यक्ष असणारे नंदकुमार शहरासह तालुक्यातील विविध सामाजिक उपक्रमात आघाडीवर असतात. तळ्यातील भैरवनाथ मंदिर परिसरात पाच-सहा वर्षांपूर्वी त्यांनी स्व:खर्चाने लावलेले वृक्ष आता डौलाने डौलू लागले आहेत. वृक्ष जगावेत यासाठी ठिबक सिंचन यंत्रणा त्यांनी बसवली. वृक्षांसाठी ट्री गार्ड बसवले. तालुक्यातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यातही हे नेहमी आघाडीवर असतात.