नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजपासून म्हणजेच, १ जुलैपासून देशात सिंगल यूज प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांतर्गत एकल वापराच्या (सिंगल यूज) प्लास्टिकच्या एकूण १९ वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.
या वस्तूंवर बंदी
प्लास्टिक पर्यावरणासाठी अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या वस्तूंवर यापूर्वीही बंदी घालण्यात आली आहे. आता नियम आणखी कठोर करण्यात येत असून ज्या प्लास्टिकच्या वस्तूंचा एकदाच वापर होऊ शकतो त्यावर आजपासून बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये थर्माकोल प्लेट्स, कप, ग्लास, कटलरी जसे की काटे चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्रे, मिठाईच्या पेटीवर रॅपिंग फिल्म, निमंत्रण पत्रिका, सिगारेटच्या पाकिटासाठी फिल्म, प्लास्टिकचे ध्वज, फुग्याच्या काठ्या आणि आईस्क्रीमच्या स्टीक आदींचा त्यात समावेश आहे.
किती मायक्रॉनला परवानगी
ऑगस्ट २०२१मध्ये सरकारने त्याची अधिसूचना काडली आहे. सिंगल युज प्लॅस्टिक बंद करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ३१ डिसेंबर २०२२पर्यंत प्लास्टिक कॅरी बॅगची किमान जाडी विद्यमान ७५ मायक्रॉन वरून १२० मायक्रॉन केली जाणार आहे. सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर दूर करण्याच्या उद्देशाने जाड कॅरी बॅग आणल्या जाणार आहेत. बंदी प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केले जातील आणि बंदी घातलेल्या एकदाच वापरलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंचे अवैध उत्पादन, आयात, वितरण, विक्री रोखण्यासाठी अधिकार्यांची एक टीम नियुक्त केली जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
व्यापाऱ्यांची मागणी
व्यापारी संघ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने सिंगल यूज प्लास्टिकवरील बंदी एक वर्ष पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. CAIT ने पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून या संदर्भात एक समिती स्थापन करावी ज्यामध्ये सरकारी अधिकारी आणि भागधारकांचे प्रतिनिधी एकत्र येतील आणि त्यांना एकेरी वापराच्या प्लास्टिकला पर्याय सापडेल.
यापूर्वीही अंमलबजावणी
१९९८ मध्ये सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालणारे सिक्कीम हे पहिले राज्य आहे. सरकारने प्लास्टिक पिशव्यांच्या जाडीसाठी एक मानक निश्चित केले आहे आणि किरकोळ विक्रेत्यांकडून पिशव्या पुरविणे बंधनकारक केले आहे. प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे, राष्ट्रीय वसाहती, जंगले आणि समुद्र किनारी स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. देशभरातील सुमारे १०० स्मारकांचा समावेश करण्यात आला आहे.
सिंगल यूज प्लास्टिक
भारतात वर्षभरात २.४ लाख टन प्लास्टिकचे उत्पादन होते. भारतात प्लास्टिकचा दरडोई वापर १८ ग्रॅम आहे. जागतिक स्तरावर दरडोई वापर २८ ग्रॅम आहे. हा उद्योग ६० हजार कोटींचा असून, ८८ हजार युनिट्स त्याच्या निर्मितीमध्ये गुंतलेली आहेत.
कुल्लडचा पर्याय
जलशक्ती मंत्रालयाने सांगितले आहे की, चहासाठी वापरल्या जाणार्या कपांऐवजी कुल्लडचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. कुल्लड केवळ चहाची चवच वाढवत नाहीत तर ते पर्यावरणपूरक आणि मातीत सहज मिसळतात आणि पाण्याची बचत करतात.
Single use plastic ban from today detail info