इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गायक सोनू निगम हा सध्या त्याच्या गाण्याच्या कार्यक्रमांपेक्षा अन्य गोष्टींमुळेच जास्त चर्चेत येत असल्याचे दिसते आहे. मध्यंतरी एका कार्यक्रमात त्याला धक्काबुक्की झाल्याने तो चर्चेत आला होता. आता त्याच्या वडिलांच्या घरी चोरी झाली आहे. सोनू निगम यांची बहीण निकिता हिने बुधवारी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार केली. चोरीला गेलेली रक्कम जवळपास सत्तर लाख आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर ही चोरी त्यांच्या आधीच्या ड्रायव्हरने केली असल्याचं समोर आलं आहे.
सोनू निगमचे वडील अगमकुमार (७२) हे मुंबईतील ओशिवरा परिसरात राहतात. १९ आणि २० मार्च दरम्यान त्यांच्या घरी चोरी झाली. निकिता हिने बुधवारी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार सोनू निगमच्या वडिलांकडे रेहान नावाचा ड्रायव्हर आठ महिने काम करत होता. परंतु त्याचं काम चोख नसल्याने सोनू निगमच्या वडिलांनी त्याला कामावरून काढून टाकलं होतं. त्यानंतरच ही घटना घडली आहे.
२० मार्च रोजी सोनू निगमचे वडील वर्सोवा येथे निकिताच्या घरी गेले होते. संध्याकाळी तिथून परतल्यावर डिजिटल लॉकरमधून ४० लाखांची रक्कम चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी ही गोष्ट लगेच फोन करून त्यांच्या मुलीच्या कानावर घातली. तर दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या मुलाच्या घरी 7 बंगला येथे व्हिसा संदर्भातील कामासाठी गेले होते. तिथून परतल्यावर त्यांच्या लॉकरमधून आणखीन ३२ लाख गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आलं. चोरीचा पाठपुरावा करताना
त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर त्यांचा आधीचा ड्रायव्हर रेहान हातात बॅग घेऊन दोन्ही दिवस ते घरी नसताना त्यांच्या घराकडे जाताना दिसला. डुप्लिकेट चावी वापरून त्यांच्या घरी घुसून चोरी केली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आता निकिताच्या तक्रारीनुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.
Singer Sonu Nigam Father Home Theft